आ. शिंदेंकडे ‘त्या’ कार्यकर्त्यांना थारा मिळणार ?

पुन्हा सत्ताधारी झाल्याने अनेकांची गोची
आ. राम शिंदे
आ. राम शिंदे

कर्जत | Karjat

राज्यातील सत्तेच्या साठमारीत माजी मंत्री तथा आमदार प्रा. शिंदे पुन्हा सत्ताधारी आमदार झाल्याने त्यांची पुन्हा कर्जत - जामखेड मतदार संघात चलती झाली आहे. यामुळे ऐनवेळी त्यांची साथ सोडणारे पुन्हा त्यांच्याकडे येण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र आहे. परंतु संकट काळात आलेल्या अनुभवातून शिंदे यांच्याकडे अशांना धारा मिळणार का? की शिंदे अशांना खड्यासारखे बाजूला करणार याची चर्चा संपूर्ण मतदार संघात रंगली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रा. राम शिंदे यांची साथ सोडत राष्ट्रवादिशी हातमिळवणी केली. त्याचा परिणाम म्हणून रोहित पवार यांनी शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला. त्यानंतर कर्जत नगरपंचायतच्या निवडणुकीदरम्यान हाच कित्ता गिरवला गेला. वास्तविक शिंदे मंत्री असताना त्यांनी कार्यकर्त्यांना मोठी ताकद दिली. त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकत त्यांना स्वातंत्र्यही दिले. परंतु अनेकांनी त्याचा गैरफायदा घेत कंत्राटे पदारात पाडून घेतली. अनेकांनी दोन नंबरचे धंदे केले. अनेकांनी शिंदे यांचा विश्वास संपादन करत आपल्या तुंबड्या भरल्या. इतके सगळे करूनही ऐन विधानसभा निवडणुकीवेळी अशांनीच त्यांची साथ सोडली. ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील धक्कादायक घटना होती.

आता महाविकासआघाडीचे सरकार कोसळून शिंदे - फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले आहे. दरम्यानच्या काळात प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली. तर विधान परिषदेच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली आहे. अगामी काळात पुन्हा मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जत- जामखेड मतदारसंघात पुन्हा प्रा. राम शिंदे यांची चलती सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दगाबाजी करणारे काही गद्दार स्वार्थापोटी पुन्हा एकदा त्यांच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.

विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवातून प्रा. राम शिंदे यांनी मोठा बोध घेतलेला दिसतो. पराभव झाल्यानंतर अडचणीच्या काळात नि:स्वार्थीपणे साथ देणारे मोजके कार्यकर्ते हीच त्यांची खरी शक्ती आहे. आ. रोहित पवारांच्या झंझावातासमोर टिकून राहत ज्यांनी पक्षाची विचारधारा पुढे नेली, त्या खर्‍या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम सध्या आ. शिंदे हे करतील अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

आतापासूनच विधानसभेची तयारी

दुधाने तोंड भाजले, तर ताकही फुंकून पिले जाते, अशी म्हण आहे. यामुळे प्रा. राम शिंदे यांना जर या मतदारसंघात पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवायची असेल तर गद्दारांना दूर ठेवून, मोजक्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जोरावर नवीन फळी, पक्ष संघटना मजबूत करावे लागेल. याची तयारी त्यांनी आताच सुरू करावी. म्हणजे त्यांनी आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू करावी असा सल्ला भाजपचे जुने जाणते पदाधिकारी देत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com