
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
विखे ज्या पक्षात जातात त्या विरोधात काम करतात. असे थेट आरोप करत भाजपचेच आ. राम शिंदे यांनी विखेंना घरचा आहेर दिला आहे. जामखेड बाजार समिती निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीचा कौल आ. राम शिंदे यांच्या गटाला मिळून सभापतिपदी शरद कार्ले हे निवडून आले आहेत.
जामखेड बाजार समिती सभापती निवडीनंतर आ. राम शिंदे हे प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे आरोप केले. या निवडणुकीत विखे पिता पुत्रांनी आ. रोहित पवार यांना मदत केल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. निवडणुकीत आम्ही पूर्ण मदत करू, असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले होते. आम्ही त्यांना उमेदवारी देतो म्हणून सांगितले, पण त्यांनी पहिल्याच दिवसापासून आम्हाला विरोध केला. त्यांनी आमच्या विरोधात उपसभापतीसाठी फॉर्म भरला असे चित्र मला बघायला मिळाले.
आमच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांंनी खुप मेहनत घेतली. जिल्हा बँकेच्या संचालका विरोधात लढलो. परंतु आमच्याच भाजपाचे खासदार सुजय विखे विरोधात लढले. शेवटी लोकांनी आम्हालाच कौल दिला. भाजपाने खासदार केले, आमदार केले, महसूलमंत्री केले अशा पद्धतीने त्यांना काय हवे होते ते दिले. कार्यकत्यार्ंच्या निवडणुकीत असे त्यांनी वागणे गैर आहे. मी नेतृत्वाला व पक्षाच्या वरिष्ठांना देखील हा विषय सांगितला आहे, असे आ. राम शिंदे बोलले.
आ. राम शिंदे यांच्या आरोपांमागे मोठ्या राजकीय घडामोडी असल्याचे बोलले जात आहे. काल(दि.16) जामखेड बाजार समिती सभापती व उपसभापती निवडणुकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे दोन्ही स्वीय सहाय्यक जामखेड येथे सकाळपासून तळ ठोकून होते. अर्थात आ. राम शिंदे यांच्या गटाचे सभापती पदाचे उमेदवार शरद कार्ले यांच्या विरोधात अर्ज भरणारे सुधीर राळेभात हे निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांच्या गटातून उभे राहिले असले तरी ते प्रथमपासून कट्टर खा. सुजय विखे पाटील यांचे कार्यकर्ते आहेत.
यामुळे आ. शिंदेंच्या विरोधात विखे यांनीच उमेदवार दिल्याची सल आ. शिंदे यांना आहे. याबरोबरच उपसभापतीपदी चिठ्ठी पद्धतीनेच निवडले गेलेले कैलास वराट हे तर खा. विखे यांचे स्वीय सहाय्यक यांचे सख्खे बंधू आहेत. यामुळे अतिशय काट्याच्या व प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत विखे यांनी पूर्णपणे आपल्या विरोधात काम केल्याची भावना आ. राम शिंदे यांची झाली आहे. यातूनच हे आरोप झाल्याची चर्चा जिल्हाभरात आहे.
आ. राम शिंदे हे सक्षम व ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेले आरोप हे काहीतरी गैरसमजातून झालेले आहेत. आरोप करण्यापूर्वी त्यांनी आपल्याशी चर्चा करायला हवी होती.
- राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री