पंतप्रधान मोदी यांच्या निर्णायामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा - आ. विखे

पंतप्रधान मोदी यांच्या निर्णायामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा - आ. विखे
आ. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी |प्रतिनिधी| Loni

आंतरराष्ट्रीय पातळीवर खतांसाठी लागणार्‍या रसायनांच्या किंमतीत वाढ झाली तरीही डीएपी खतांच्या वाढीव अनुदानासाठी 14,775 कोटी रुपयांचा बोजा सोसून शेतकर्‍यांना मागील वर्षीच्या जुन्याच भावाने रासायनिक खत उपलब्ध करून देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचा शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आ. विखे पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने रासायनिक खतांसाठी आणखी 14,775 कोटी रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डीएपी खतासाठीची सबसिडी 140 टक्के वाढली असून आता शेतकर्‍यांना डीएपी खताची गोणी मागील वर्षीच्याच म्हणजे 1200 रुपये भावाने उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने केंद्र सरकारचा निर्णय शेतकर्‍यांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्याच पध्दतीने आजचा निर्णयही स्वागतार्ह असल्याचे विखे पाटील म्हणाले.

आंतरराष्ट्रीय बाजारात रासायनिक खतासाठी लागणार्‍या फॉस्फरिक अ‍ॅसिड, अमोनिया या रसायनांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे खत कंपन्यांनी भारतात रासायनिक खताच्या किंमतीत वाढ केली. परंतु सध्याच्या परिस्थितीत शेतकर्‍यांना या खताच्या किंमतीचा वाढीव बोजा झेपणारा नव्हता यासाठीच केंद्र सरकारने याबाबत घेतलेला निर्णय देशातील कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण असल्याचे विखे यांनी नमूद केले.

शेतकर्‍यांसमोर सध्या कोविड आणि नैसर्गिक आपत्ती संकटाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.तरीही मागील वर्षभरात देशातील कृषी क्षेत्राने चमकदार कामगिरी केल्यामुळेच अर्थव्यवस्थेला स्थिरता मिळाल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.

कोविड महामारीच्या भयानक संकटात देशात अन्नधान्याची कमतरता भासली नाही यामागे शेतकर्‍यांचे कष्ट आहेत याची जाणीव ठेवून आंतरराष्ट्रीय बाजारात रसायनांच्या किंमतीत वाढ झाली असली तरी अनुदानाचा वाढीव बोजा सहन करून शेतकर्‍यांना गेल्या वर्षीच्या भावातच खते उपलब्ध करण्याचा मोदी सरकारचा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारला 14,775 कोटींचा बोजा सोसावा लागणार असला तरी शेतकर्‍यांसाठी डीएपी खतासाठीची भाववाढ कमी झाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा असल्याचे आ. विखे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com