सध्याच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर साईबाबांचा सबका मालिक एक हा मंत्रच सर्वांसाठी उपयुक्त - आ. विखे पा.

सध्याच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर साईबाबांचा 
सबका मालिक एक हा मंत्रच सर्वांसाठी उपयुक्त - आ. विखे पा.

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीच्या भूमिने नेहमीच सर्वधर्म समभावाचे दर्शन घडविले आहे. सध्या निर्माण केल्या जात असलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमिवर साईबाबांनी दिलेला सबका मालिक एक हा मंत्रच सर्वांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

रमजान ईदच्या पार्श्वभूमिवर मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या सामुदायिक प्रार्थना कार्यक्रमात आ.विखे पाटील यांनी सहभाग घेऊन सर्व मुस्लिम धर्मियांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, अभय शेळके, प्रतापराव जगताप यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुस्लिम समाजाच्यावतीने आ.विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

आपल्या शुभेच्छापर भाषणात आ.विखे पाटील म्हणाले, रमजान ईदचा हा सण नवी उमेद आणि आनंद निर्माण करणारा असतो. महिनाभराच्या प्रार्थनेतून आपल्याला संयम आणि शांततेची शिकवणूकच मिळत असते असे त्यांनी स्पष्ट केले. श्री.साईबाबांच्या वास्तव्याने या भूमिचे नाव जगात पोहोचले आहे. बाबांनी संपूर्ण विश्वाला सबका मालिक एक असा संदेश दिला. या विचारानेच शिर्डीच्या भूमिने नेहमीच सर्वधर्म समभावाचे दर्शन घडविले. जातपात आणि धर्माच्या नावावर येथे कधी मनभेद झाले नाहीत.

सध्या निर्माण होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर साईबाबांचा हा संदेशच उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करतानाच इतरत्र कुठलेही वातावरण निर्माण झाले तरी, शिर्डी मतदार संघात सर्वधर्म आणि समाज एकत्रितपणेच काम करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.