जखमेची चौकशी करणे म्हणजे ‘अजब सरकारचा गजब कारभार’ - आ. विखे

जखमेची चौकशी करणे म्हणजे ‘अजब सरकारचा गजब कारभार’ - आ. विखे
आ. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी |प्रतिनिधी| Loni

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याचे सोडून त्यांच्या जखमेची चौकशी करणे म्हणजे अजब सरकारचा गजब कारभार, अशी प्रतिक्रिया आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात महाविकास आघाडीवर टीका करताना आ. विखे पाटील म्हणाले, आघाडी सरकारमधील मंत्रीच आता सुरक्षित राहीलेले नाहीत. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्विय सहाय्यकावर झालेल्या गोळीबाराची घटना आणि मंत्र्यांना जीवे मारण्याची आलेली धमकी पाहता राज्यातील जनतेला हे सरकार कोणती सुरक्षा देणार?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्यात भाजप नेत्यांवर पोलिसांदेखत खुलेआम हल्ले होतात. तरीही पोलीस गप्प बसण्याची भूमिका घेतात. हल्ल्याची चौकशी करायचे सोडून त्यांच्या जखमेची कसली चौकशी करता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात कायद्याचा धाक राहिला नसून आतंकवाद्यांशी संबंध असलेले नबाब मलिक अजूनही मंत्री पदावर कायम आहेत. त्यामुळे गुंडांचे बळ वाढत असून जनता सहन करीत आहे. सोमय्यांवरील हल्ल्याच्या संदर्भात महसूलमंत्र्यांनी केलेल्या कौतुकाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. विखे पाटील म्हणाले, प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजत आहे. सरकारमध्ये सब मिल के खावो असा कारभार चालला आहे. एकत्रित बसून भ्रष्टाचार करीत आहेत.

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर आपले मत व्यक्त करताना आ. विखे पाटील म्हणाले, सरकार राज ठाकरेंना का घाबरत आहे. तुमचा कारभार जर पारदर्शक आहे, जनता आमच्या पाठीशी असल्याचे तुम्ही सांगता मग सभेला परवानगी का नाकारता.औरंगाबाद येथे शरद पवारांच्या उपस्थितीत शिक्षकांचा मेळावा झालेला चालतो मग राज ठाकरेंच्या सभेला लगेच जमावबंदीचे कारण सांगितले जाते.

Related Stories

No stories found.