हॉटेल स्टाफचे सक्तीने लसीकरण करून घ्यावे - आ. विखे

हॉटेल स्टाफचे सक्तीने लसीकरण करून घ्यावे -  आ. विखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

नगरपंचायत आणि राहाता ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून शहरात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेतून करोना मुक्त शिर्डी करण्याचा संकल्प असून मंदिर सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या स्टाफचे लसीकरण सक्तीने करून घेण्याच्या सूचना आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

शिर्डी शहरातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी नगरपंचायतीने आदर्श माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून लसीकरणाबाबत माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, सुजीत गोंदकर, नितीन कोते, अशोक गायके, बाबुभाई शेख, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, उपाध्यक्ष अशोकराव पवार, भाजपाचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, किरण बोर्‍हाडे, पोपट शिंदे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, वैद्यकीय आधिकारी डॉ. घोगरे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

कोविड संकटाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन शहरातील 18 ते 44 वयोगटातील तसेच दुसरा डोस न मिळालेल्या नागरिकांसाठी लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीने विशेष मोहीम हाती घेऊन लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन सुरू केले आहे. या मोहिमेला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच भाजपाचे सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेऊन लस घेण्याकरिता नागरिकांना प्रवृत करीत आहेत. आजपर्यंत 700 हून अधिक नागरिकांचे लसिकरण पूर्ण झाले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात मोफत लस उपलब्ध करून दिल्यानंतर आजपर्यंत देशातील 90 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

यासाठी शिर्डी नगरपंचायत आणि राहाता ग्रामीण रुग्णालय यांनी विशेष पुढाकार घेऊन ही मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून करोनामुक्त शिर्डी करण्याचा प्रयत्न असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.

राज्य सरकारने 7 तारखेपासून मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमिवर शहरात पुन्हा भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, शहरातील हॉटेल व्यवसायिकांनी आपल्या कर्मचार्‍यांचे संपूर्ण लसीकरण सक्तीने करून घेण्याबाबत नगरपंचायतीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी याप्रसंगी मुख्याधिकार्‍यांना दिल्या.

Related Stories

No stories found.