यापुढील सर्व निवडणुका भाजपच्या झेंड्याखालीच - आ. विखे

यापुढील सर्व निवडणुका भाजपच्या झेंड्याखालीच - आ. विखे

श्रीरामपुरात भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा व दिवाळी फराळ

श्रीरापपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील सर्व निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लढविण्याचा निर्धार व्यक्त करून, आतापासूनच बुथ कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करावी. यासाठी शहरात सुकाणू समिती नेमण्याची घोषणा माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने श्रीरामपूर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात आ. विखे पाटील यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधत आगामी निवडणुकांबाबतचे भाकितही यावेळी केले.

कोविडचे संकट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील जनतेचे प्रश्न गंभिर बनले आहेत. तीन पक्षांच्या सरकारला जनतेचे प्रश्न सोडविण्यात कोणतेही स्वारस्य राहीले नाही. जनतेचा उद्रेक रस्त्यावर येऊ नये म्हणून सरकार फक्त जनतेवर दबाव आणत आहे. प्रश्न सोडविण्याला महत्त्व देण्यापेक्षा जमावबंदी आदेश लागू करण्यातच सरकारचे महत्त्व अधिक दिसत असल्याचा टोला भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. यापुढील सर्व निवडणुका या भाजपाच्या झेंड्याखालीच लढविल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात या सरकारने राज्यातील जनतेला कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप करून, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा सरकारने पाठविण्यात धन्यता मानली. एसटी कामगार आज आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात बसून आहे. सरकारच्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या फक्त बैठका सुरू आहेत. कामगारांना न्याय देण्याची इच्छाशक्ती महाविकास आघाडी सरकारमध्ये नसल्याची टीका त्यांनी केली.

केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील 110 कोटी लोकांना कोव्हीड लसीची मात्रा देण्याचा विक्रम केला आहे. 80 कोटी लोकांना मोफत धान्य उपलब्ध करून दिले. पेट्रोल डिझेलवरील कर माफ करून जनतेला दिलासा दिला. पण राज्य सरकार कर कमी करायला तयार नाही. यांना दारूवरचे कर कमी करण्यात अधिक धन्यता वाटत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. गावोगावी असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. पण महाविकास आघाडी सरकारने मंत्री नबाब मलिक यांना पुढे करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. कोणी गांजा पिला की ड्रग्ज घेतले याच्याशी राज्यातील जनतेला देणेघेणे नाही. नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा महत्त्वाच्या आहेत. मूळ प्रश्नापासून लक्ष विचलीत करण्यासाठीच महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाला अधिक महत्त्व दिले असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती देण्यासाठी नागरिकांशी संपर्क करण्याचे आवाहन केले. नगरपालिकेने कोविडच्या पार्श्वभूमीवर व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना करांमध्ये सूट द्यायला हवी होती. पण तसा कोणताही निर्णय केला नाही. शेती महामंडळाच्या जमिनीबाबत इकडे येऊन भाषण करायची आणि तिकडे न्यायालयाच्या लढाया करायला लावून या जमिनी धनदांडग्याच्या घशात घालण्याचे काम सुरू असल्याकडे आ. विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

याप्रसंगी माजी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी सभापती नानासाहेब पवार, दीपक पटारे, सुनील वाणी यांची भाषणे झाली. मेळाव्यास नानासाहेब शिंदे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, बाबासाहेब चिडे, शशिकांत कडुस्कर, जि. प. सदस्य शरद नवले, बाळासाहेब तोरणे, नितीन भागडे, नानासाहेब शिंदे, उत्तर नगर जिल्हा महिला अध्यक्षा पुष्पलता हरदास, भाजपाचे तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, गणेश राठी, आरपीआयचे भिमा बागुल, गणेश मुदगुले, विराज भोसले, संगीता गांगुर्डे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, विठ्ठलराव राऊत, रेखा रिंगे, सुप्रिया धुमाळ, नगरसेवक मुक्तार शहा, संतोष कांबळे, राधाकिसन देवरे, गिरीधर आसने, भाऊसोहब बांदे्रे, संजय गांगड, अशोक उपाध्ये, देविदास चव्हाण, विजय आखाडे, केतन खोरे, चित्रसेन नन्नवरे यांच्यासह कार्यकर्ते, रुपेश हरकल, नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com