
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हायकमांड नेमके कोण आहेत याची चिंता करणार्या संजय राऊतांचे हायकमांड सुध्दा आम्हाला सिल्व्हर ओकवरच दिसत होते असा टोला आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौर्यावर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना आ. विखे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, शिंदे दिल्लीत जातात कोणाला भेटतात त्यांचे हायमांड कोण आहेत याची चिंता राऊत यांनी करू नये, कारण त्यांचे हायकंमाड कुठे जात होते, कोणाला भेटत होते हे संपूर्ण राज्याने पाहिले असल्याकडे आ.विखे पाटील यांनी लक्ष वेधले.
राज्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आता एकनाथ शिंदे यांच्याकडे येवून पाठबळ देत आहेत. याचा विचार करण्यापेक्षा संजय राऊत रोज नविन वक्तव्ये करीत आहेत. यांच्या रोजच्या नव्या वक्तव्यांमुळे त्यांना कोणीही आता गांभीर्याने घेत नाही.त्यांच्या वक्तव्यांकडे फक्त आता करमणूक म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे एका मुख्यमंत्र्यांची वाट लागली आता ते पक्षाची वाट लावत असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.
राज्यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचे नामकरण करून शिंदे फडणवीस सरकारने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण केली. आता अहमदनगर नगर जिल्ह्याच्या नामकरणाबाबत विषय समोर आला या प्रश्र्नावर बोलताना आ.विखे म्हणाले की,यामध्ये लोकभावनाही लक्षात घ्याव्या लागतील. वेगवेगळे मतप्रवाह या विषयावर असले तरी पक्ष आणि सरकार स्तरावर होणारी भूमिका महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.