सहकार चळवळ टिकविण्यासाठी कामगारांचे मोठे योगदान - आ. विखे

सहकार चळवळ टिकविण्यासाठी कामगारांचे मोठे योगदान - आ. विखे

लोणी |प्रतिनिधी| Loni

सहकार चळवळीत काम करणार्‍या कामगारांनी या चळवळीत स्वत:ला झोकून देत ही चळवळ टिकवून ठेवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. या सहकार चळवळीवर आलेली संकट ही स्वत:ची समजून या चळवळीला जोपासण्याचे काम केले. सहकाराचा हा संस्कारच कामगारांच्या व्यक्तिगत आयुष्यातही विकासाचा मानबिंदू ठरला असल्याचे प्रतिपादन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यातील निवृत्ती आधिकारी आणि कर्मचार्‍यांचा कृतज्ञता समारंभ आ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत कामगार दिनाच्या निमित्ताने संपन्न झाला. याप्रसंगी उपाध्यक्ष विश्वासराव कडू, साखर कामगार सभेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, संचालक संजय आहेर, सतिष ससाणे, दादासाहेब घोगरे, संपतराव चितळकर, बाबुराव पडघलमल, शांताराम जोरी, कामगार संचालक पोपटराव वाणी, दिलीप कडू, कामगार सोसायटीचे निवृत्ती तांबे, कार्यकारी संचालक अभिजित भागडे याप्रसंगी उपस्थित होते.

कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलेला कामगार हा स्वकौशल्याने उद्योग क्षेत्राला पुढे घेवून जात असतो. देशाच्या आणि राज्याच्या औद्योगिक विकासामध्ये कामगारांचे योगदान खुप मोठे आहे. वर्षानुवर्षे कामगार चळवळीने या देशाच्या प्रगतीत दिलेले योगदान महत्वपूर्ण असल्याचे नमुद करुन आ. विखे पाटील म्हणाले की, सहकार चळवळीत काम करणारे कामगारही या राज्याच्या विकासाचे घटक आहेत. ही चळवळ टिकवून ठेवण्यात कामगारांनी केलेले सहकार्य सुध्दा उल्लेखनिय आहे. या चळवळीसमोर अनेक आव्हान उभी राहीली, तरीही न डगमगता या चळवळीशी कामगारांनी ठेवलेली बांधिलकी मोलाची ठरल्यानेच या चळवळीची वाटचाल यशस्वी असल्याचे त्यांनी सांगितले.

पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याची वाटचाल 72 वर्षापासून यशस्वी सुरु आहे. यामध्ये सुध्दा कामगारांनी केलेल्या सहकार्याची जाणीव असल्याचे सांगून आ. विखे पाटील म्हणाले की, कोविड संकटात काही आधिकारी आणि कामगारांना आपल्याला गमवावे लागले. सामाजिक बांधिलकी म्हणून कोविड संकटात प्रवरा परिवाराने आरोग्याच्या दिलेल्या सुविधांचा लाभ कामगारांना देण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करुन दिलेल्या मोफत लसीमुळे देशाची वाटचाल पुन्हा स्थिरतेकडे सुरु झाली आहे. केंद्र सरकारने असंघटीत कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करुन कामगार वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.