
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
यापुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप-आणि फक्त भाजपच म्हणून राहणार आहे. इकडे-तिकडे जाणार्यांना आपल्याकडे थारा नाही. तरी यापुढे सर्वांनी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजपाचीच सत्ता येण्यासाठी आपल्याला काम करायचे असून त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामास लागावे. श्रीरामपूर नगरपालिकेत भाजपाची सत्ता आणण्याची मोठी संधी असून त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामास लागावे, असे आवाहन माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपूर येथील अपूर्वा हॉलमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा तसेच तालुक्यातील सर्व बुध प्रमुख, शक्ती प्रमुख यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी नूतन भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांना आ. राधाकृष्ण विखे पा. व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
आ. विखे पा. म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वसामान्य जनतेसाठी तब्बल 70 योजना राबवल्या. या योजनांचा लाभ हजारो लाखो लोकांना तालुक्यात, जिल्ह्यात झाला. यावेळी विखे पाटील यांनी लाभार्थीचे आकडेही बुथप्रमुखांना वाचून दाखविले. मोदींनी एवढ्या योजना राबवल्या या योजनांच्या लाभार्थीपर्यंत आता बुथप्रमुखांनी जाणे आवश्यक आहे. ते काम भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने आता करणे गरजेचे आहे. शतप्रतिशत भाजप आणण्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, बुथप्रमुखाने आता कट्टरतेने काम केले पाहीजे. श्रीरामपूरकरांना यंदा कमळ फुलवण्याची मोठी संधी आलेली आहे. आगामी सर्व निवडणुका या भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवल्या जाणार आहे. त्यादृष्टीने सर्वांनी काम करावे, असे आ. विखे पाटील म्हणाले.
तालुक्यात सोसायटींच्या निवडणुकींचा संदर्भ देत आ. विखे पाटील म्हणाले आपले काही लोक काही गावांमध्ये ससाणेंबरोबर युती करतात, काहीजण मुरकुटेंबरोबर युती करतात. काही ठिकाणी तिघांच्याही युती होतात. अशा प्रकारचे मिक्सिंग आणि फिक्सिंग यापुढे तालुक्यात चालणार नाही. शतप्रतिशत भाजप हाच नारा राहणार आहे, याचा आ. विखे यांनी आवर्जून उल्लेख केला.
भाजपा निष्ठावंताची विखेंसमोर नाराजी
श्रीरामपूर येथे भाजपचे बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांच्या मेळाव्यात टाकळीभान येथील निष्ठावंत कार्यकर्ते नारायण काळे यांनी विखे व पटारे यांच्या समोरच अतिशय परखड व स्पष्ट शब्दांमध्ये नव्या तालुकाध्यक्ष नियुक्तीबाबत नाराजी व्यक्त केली. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची कत्तल होत राहिल्यास निष्ठावंतांपेक्षा बाहेरून येणारेच शिरजोर होतील, पटारे यांची नियुक्ती करताना पक्षाच्या पदाधिकार्यांनी अध्यक्ष निवडीचे नियम धुडकावून देत कोणाच्या तरी दबावाखाली येऊन ही नियुक्ती केली आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना श्री. काळे यांनी व्यक्त केली.