करोना अपडेट
करोना अपडेट
सार्वमत

आमदारांच्या उपस्थितीत पार्टीला करोना पॉझिटीव्ह पदाधिकार्‍याची उपस्थिती

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अकोलेचे आमदार व तहसीलदार हे कंटेन्मेंट व बफर झोनमध्ये मटनाच्या पार्ट्यांना उपस्थित राहून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवित आहेत. त्या पार्टीत करोना पॉझिटिव्ह व्यक्तीही उपस्थित होती. त्यांचेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकोले तालुका करोनामुक्त होत असून नागरिक काळजी घेत असताना तालुक्याचे आमदार हे तहसीलदार यांच्यासमवेत मटनाच्या पार्ट्यांना उपस्थित राहत आहेत. त्या पार्टीत करोना पॉझिटिव्ह पदाधिकार्‍यांसमवेत भोजन घेत असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे सोशल डिस्टन्स पाळत नाहीत. त्यामुळे तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. शिवभोजन थाळीचे उद्घाटनही कोणतेही नियम न पाळता करण्यात आले. सामान्य जनतेला नियम लागू केले जातात. मात्र हा सामान्य जनतेला एक न्याय आणि लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना वेगळा न्याय असे होत आहे.

लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी मटन पार्टीला उपस्थित राहतात. त्यात स्वॅब घेतलेल्या व्यक्ती येतात कशा? स्वॅब घेतलेली माहिती असतानाही अहवाल येईपर्यंत या व्यक्ती बाहेर फिरतात कशा? तेही लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या समवेत? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे.

या प्रकरणाची तात्काळ चौकशी होऊन लोकप्रतिनिधी व अधिकारी, पदाधिकारी ज्यांनी मटन पार्टीत मटनाचा आस्वाद घेणार्‍या व देणार्‍यावर तात्काळ कारवाई करावी. रोगसाथ प्रतिबंधक कायदा 1869 नुसार भारतीय दंड संहिता 188 नुसार कारवाई करावी, अशीही मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, पोलीस अधीक्षक नगर, उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

अकोले शहरात झालेल्या ‘त्या’ मटन पार्टीला उपस्थित असणारे अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह कुटुंबियांना क्वारंटाईन करून त्यांची करोना चाचणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com