शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून मंत्रीमंडळ अयोध्येला गेले - आ. तनपुरे

शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून मंत्रीमंडळ अयोध्येला गेले - आ. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

एकीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झालेला असताना शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ अयोध्या दौर्‍यावर गेले. प्रभू श्रीरामांनी आपल्या वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी वनवासात गेले तर दुसरीकडे रामांचे नाव घेऊन राजकारण करणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसदारांना फसवणारे अयोध्या वारीवर गेले, असा घणाघात माजी ऊर्जा राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला.

राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील 5 एमव्हीए ट्रान्सफार्मर बसविणे व ताहराबाद वीज उपकेंद्रामधील नवीन फिडर तसेच उपकेंद्र ते गाडकवाडी फाटा फीडर लिंक लाईनच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सुमारे 1 कोटी 34 लाख रुपये खर्चाच्या निधीचा उपयोग सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांसाठी करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधर जाधव होते.

आमदार तनपुरे म्हणाले की, मागील अवकाळी पावसाची भरपाई मिळण्यासाठी विधानसभेमध्ये घसा कोरडा होईपर्यंत आवाज उठविला होता. अद्यापही शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. त्यातच आता पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्‍यांची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. शेतकरी मोठ्या आर्थिक चक्रात अडकला. शेतकर्‍यांप्रती हे सरकार संवेदनशून्य आहे. अयोध्या वारी करून जनतेला हे सरकार काय संदेश देऊ इच्छिते हे न समजण्याइतकी जनता खुळी नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व घटकांसाठी सत्ता राबवली. विद्यमान सरकार मात्र, केवळ भावनिक राजकारण करण्यात रंगले असल्याचे तनपुरे यांनी नमूद केले.

ऊर्जा राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे पूर्ण केली. आज त्याची परिणिती दिसून येत आहे. विजेचा जटिल प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले होते. विशेषतः शेतकर्‍यांसाठी येणार्‍या अडचणी कशा दूर करता येतील. याचा अभ्यास करून प्रश्न निकाली काढण्याचे समाधान लाभत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ताहाराबादचे सरपंच निवृत्ती घनदाट, चिखलठाणचे सरपंच डॉ. सुभाष काकडे, ताहराबादचे उपसरपंच पप्पू माळवदे, चिकलठाणचे उपसरपंच आबासाहेब काळनर, चंद्रकांत हारदे, बापू जगताप, सीताराम झावरे, बाळासाहेब गागरे, नानासाहेब हांडे, गहिनीनाथ हुलुळ, विजय आंबेकर, भारत रोकडे, गंगाधर हारदे, पाराजी गागरे, भीमराज गागरे, विलास गागरे, अशोक करडे, उत्तम शिंदे, बापूसाहेब घागरे, फिरोज शेख, गीताराम वाबळे, उत्तमराव विधाते, नवनाथ हारदे यासह परिसरातील लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. माने यांनी केले तर चांगदेव चोपडे यांनी आभार मानले

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com