
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
वांबोरी चारी सुटण्यासाठी प्रयत्नपूर्वक सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या असून येणार्या एक ते दोन दिवसात शेतकर्यांची गरज ओळखून पाणी सुरू होईल. यामध्ये श्रेयासाठी ज्यांना चारीची कळ दाबायची आहे, त्यांनी जरूर दाबावी; परंतु राजकीय वादात शेतकर्यांचे हाल करू नये, असे आवाहन माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले. आपल्याला श्रेय वादात नव्हे तर शेतकर्यांना शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळण्यात स्वारस्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
वांबोरी चारीच्या देखभाल दुरुस्ती करून पाणी सुटण्याबाबत आ. तनपुरे यांनी पत्रकारांना विस्तृत माहिती दिली. गेल्या तीन वर्ष लोकप्रतिनिधित्व स्वीकारल्यापासून वांबोरी चारीला पाणी सोडणे ही प्राथमिकता ठेवून वांबोरी, कात्रड, गुंजाळे व नगर पाथर्डी तालुक्यातील शेवटच्या टोकाच्या गावापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी योग्य ते नियोजन केले. निसर्गानेही गेली तीन वर्षे भरभरून साथ दिली. गरज असेल, त्यावेळी पाटबंधारे खात्याला कळवून चारी सोडण्यासंदर्भात नियोजन केले.
संबंधित अधिकार्यांनीही योग्य प्रतिसाद देत कामे केली व त्यातूनच तिसगाव सातवडसह स्टीलच्या भागाला पाणी देण्यात यश आले. शेतकर्यांची आताही पाणी सोडण्याची मागणी होतीच. गेल्या महिनाभरापासून प्रयत्न सुरू आहेत. भाजपा शासन काळात अधिकार्यांकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. यासाठी गोदावरी मराठवाडा महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना बोलून चारी सोडण्याबाबत मागणी केली.
चारी सोडल्यानंतर शेतकरी पैशाचा भरणा करतील यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू अशी विनंती करूनही अधिकारी ऐकण्यास तयार नसताना स्थानिक अधिकार्यांना शेतकर्यांकडून पैसे गोळा करण्यासंबंधी सूचना केल्या; परंतु पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळालेला नाहीं. शेतकर्यांची गरज ओळखून आपण स्वतः व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दीड लाख रुपयांचा भरणा करून वीज कनेक्शन जोडून घेतले. सर्व देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहे.
सरकार आपल्या विचाराचे नसले तरी पाठपुरावा करून शेतकर्यांची गरज महत्त्वाची आहे. यासाठी सर्व नियोजन करून चारी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्यांनी मागील सरकारच्या काळात कधीही वांबोरी चारीसाठी कधी प्रयत्न केले नाहीत, ते आता कळ दाबून फोटोसेशन करण्याची हौस भागवतील. आपल्याला यामध्ये श्रेयवादात पडायचे नाही तर शेतकर्यांना पाणी द्यायचे आहे.
यापूर्वी ठेकेदारही पाणी सोडताना मनमानी करीत नियोजन कोलमडत होते; परंतु आपण तीन वर्षाच्या काळात वेळोवेळी शेवटच्या टोकापर्यंत पाणी नेण्याचे नियोजन केले. यापूर्वी लोकप्रतिनिधी कळ दाबून मोकळे व्हायचे, पाणी कुठपर्यंत गेले याचे त्यांना काही घेणे देणे नसायचे; परंतु अभ्यासपूर्ण नियोजनातून आपण शेवटच्या टोकापर्यंत पाणी नेण्याचे नियोजन केले आहे येणार्या एक-दोन दिवसात चारीला पाणी सुटेल अशी ग्वाही आमदार तनपुरे यांनी दिली.