उपचाराअभावी एकाही जनावराचा मृत्यू व्हायला नको

‘लम्पी’ आढावा बैठकीत आमदार तनपुरे यांच्या अधिकार्‍यांना सूचना
 प्राजक्त तनपुरे
प्राजक्त तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

लम्पी आजारामुळे शेतकर्‍यांकडील एकाही जनावराचा उपचाराअभावी मृत्यू होणार नाही तसेच सर्वच जनावरांचा आजारापासून बचाव होण्यासाठी लसीकरण पूर्ण करावे, अशा सक्त सूचना माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या.

पंचायत समितीच्या डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृहात सद्यस्थिती जाणून घेतली. बैठकीत त्यांनी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना सूचना केल्या. तालुक्यातील जनावरांची अधिकृत माहिती घेतली. चालू असलेल्या लसीकरणाबाबत पडताळणी केली. राहुरी तालुक्यात सुमारे एक लाख जनावरांची संख्या आहे. त्यापैकी 62 हजार 803 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी संबंधित पशुवैद्यकीय विभागाने अधिक वेगाने काम पूर्ण करावे. काही अडचणी असल्यास स्पष्टपणे निदर्शनास आणून द्याव्यात, ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्याशी संपर्क साधून लसीकरण राहिलेल्या जनावरांची माहिती घेतल्यास काम अधिक सुलभ होईल. जनावरांचा मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात, असे तनपुरे यांनी नमूद केले.

तालुक्यात 130 जनावरांना लम्पी आजाराची बाधा झाली होती. त्यापैकी 65 जनावरे आजारातून मुक्त झाली तर उर्वरित जनावरे प्रतिसाद देऊ लागली आहेत. तालुक्यात आज अखेर सहा जनावरांचा मृत्यू झाला आहे. यात चेडगाव दोन, मुसळवाडी एक, देवळाली प्रवरा दोन, अंमळनेर एक अशी संख्या आहे.

तनपुरे यांनी संबंधित विभाग अधिकार्‍यांकडून गावनिहाय माहिती घेतली. जनावरांचे शंभर टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे त्यांनी आदेश दिले. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी बैठकीत दिलेली माहिती संबंधित गावातील प्रमुखांशी आ. तनपुरे यांनी संपर्क साधून खातरजमा केली यात काही प्रमाणात तफावत आढळून आली. काही तांत्रिक अडचणींमुळे तफावत निदर्शनास आल्यानंतर उपाययोजना त्यांनी सुचविल्या. पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. सतीश पालवे, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अमर प्रसाद माने, सहाय्यक पशुधन अधिकारी पशुधन पर्यवेक्षक व 15 पशुधन रुग्णालयांचे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com