
करंजी |प्रतिनिधी| Karanji
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून थकबाकीच्या नावाखाली शेतकर्यांकडून शेतीपंपाच्या वीज बिलांची जुलमी वसुली तातडीने थांबवावी अन्यथा 7 डिसेंबरला मिरी वीज उपकेंद्रावर शेतकर्यांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे आमदार तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात 39 गावांतील शेतकर्यांच्या शेती पंपांच्या वीज प्रश्नासंदर्भात समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी अनेक शेतकर्यांनी राज्य सरकार व महावितरणच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. एकिकडे उपमुख्यमंत्री म्हणतात शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद केला जाणार नाही. तर महावितरणचे अधिकारी थकबाकीचे कारण पुढे करत शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद करू लागले आहेत. पाच हजार रुपये शेतकर्यांनी भरावेत यासाठी शेतकर्यांची अडवणूक केली जात आहे.
मुळात रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना सरकार मात्र महावितरणच्या आडून वसुली करत आहे अशा शब्दात उपस्थित अनेक शेतकर्यांनी आपल्या भावना आमदार तनपुरे समोर व्यक्त केल्या. आमदार तनपुरे म्हणाले मागील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये ऊर्जा विभागाने अनेक कृषी धोरणे आणली. 50 ते 60 टक्के मागची वीज बिल माफ केली. आत्ताच्या शिंदे फडणवीस सरकारकडे शेतकर्यांसाठी कोणतेही व्हिजन नाही कोणतेही कृषी धोरण नाही सरकारमध्येच अवमेळ असल्याचे दिसून येत आहे.
ते शेतकर्यांना काय न्याय देणार असा सवाल उपस्थित करत या सरकारच्या निषेधार्थ मिरी येथे सब स्टेशनवर शेतकर्यांसोबत धरणे आंदोलन करण्याचा इशारा आमदार तनपुरे यांनी यावेळी दिला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, सरपंच काशिनाथ पाटील लवांडे, युवानेते अमोल वाघ, जालिंदर वामन, अंबादास डमाळे, सरपंच सुधाकर वांढेकर, पिनू मुळे, राजेंद्र पाठक, अजय पाठक, रमेश गीते, सचिन होंडे, बद्रीनाथ सोलाट, सुनील पुंड, सुनील लवांडे, शिवसेनानेते राजेंद्र म्हस्के, प्रतीक घोरपडे, आबासाहेब अकोलकर, अमोल वाघ, हनुमंत घोरपडे, बंटी अकोलकर, रमेश शिंदे, राजेंद्र अकोलकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरण अधिकार्यांना खडसावले
वीज प्रश्नासंदर्भात शेतकर्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार तनपुरे यांनी तिसगाव जनसंपर्क कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महावितरणचे काही अधिकारी उशिरा पोहोचल्यानंतर आमदार तनपुरे यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले.