..यांनी गुजरातला विकासाचे केंद्र बिंदू मानले

माजी मंत्री तनपुरे यांची राज्य सरकारवर टीका
प्राजक्त तनपुरे
प्राजक्त तनपुरे

करंजी |प्रतिनिधी| Karanji

महाविकास आघाडीच्या सरकारने मागील अडीच वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला विकासाचे केंद्रबिंदू मानून अनेक विकासभिमुख योजना आणल्या मात्र खोके आणि ओकेमुळे नव्याने स्थापन झालेल्या या सरकारने महाराष्ट्राला नव्हे तर गुजरातला केंद्रबिंदू मानून अनेक कंपन्या गुजरातच्या घशात घालण्याचे काम करत महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे काम केले असल्याची टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर केली.

पाथर्डी तालुक्यातील ज्या लाभधारक तलावांना वांबोरी चारीचे पाणी सोडण्यात आले आहे त्या तलावातील पाण्याचे जलपूजन आमदार तनपुरे यांच्या हस्ते ठिकठिकाणी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तनपुरे म्हणाले, खोके घेऊन ओके झालेल्या या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये मोठा रोष असून याचाच एक भाग अकोले येथील निवडणुकीतून दिसून आला आहे. पिचड भाजपमध्ये गेले आणि त्यांची राजकीय घरघर सुरू झाली. हातातला साखर कारखाना देखील आता निघून गेला. नविन सरकारने आम्ही मंजूर केलेला निधी देखील रद्द करून सर्वसामान्य जनतेची मोठी घोर निराशा केली आहे. कोर्टाच्या निकालावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे या सरकारच्या माध्यमातून निष्ठा आणि प्रतिष्ठा या शब्दालाच काळीमा फासण्याचे काम झाले आहे, असे आमदार तनपुरे म्हणाले.

या कार्यक्रमाप्रसंगी माजी जि. प. सदस्य बाबासाहेब भिटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रफीक शेख, सरपंच अमोल वाघ, राजेंद्र पाठक, सरपंच सुधाकर वांढेकर, विलास टेमकर, रवींद्र मुळे, शिवसेनेचे नेते राजेंद्र म्हस्के, ज्येष्ठनेते कुडलिक मचे, संभाजी वाघ, अजय पाठक, अशोक टेमकर, जालिंदर वामन, विजय पालवे, बाळासाहेब पालवे, नामदेव मुखेकर, देवेंद्र गीते, बाळासाहेब मुखेकर, महादेव अकोलकर, उपसरपंच संदीप साळवे, तुळसिदास शिंदे, प्रतीक घोरपडे आदी उपस्थित होते.

राज्यात सत्ता नसली तरी अजूनही आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळून एकमेकांच्या विचारांसोबत आहोत. त्यामुळे शिवसेनेला कमी लेखण्याचा प्रयत्न कोणी करू नये. मिरी गटात शिवसेनेचे मोठे योगदान राहिले आहे तुम्ही तिकडून लई दंड थोपटले तर आम्ही पण लंगोट लावून तयार आहोत अशा शब्दांत शिवसेना उपजिल्हाप्रमुख रफीक शेख यांनी शिवसेनेला पाण्यात पाहणार्‍यांना सूचक इशारा दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com