कर्जत-जामखेडचे कांदा चाळीचे अनुदान जमा : आ. पवार
सार्वमत

कर्जत-जामखेडचे कांदा चाळीचे अनुदान जमा : आ. पवार

Arvind Arkhade

जामखेड/कर्जत (वार्ताहर) - गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या कांदाचाळींचे अनुदान अखेर आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळेे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले आहे.

राज्य शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांनी कांदाचाळीची उभारणी केली होती. मात्र गेली दीड वर्षापासून कांदा चाळींच्या अनुदानाचे भिजत घोंगडे तसेच पडले होते. अनुदान मिळण्यास विलंब झाल्याने मतदारसंघातील शेतकर्‍यांनी आपल्या अडचणींचा पाढा आ. रोहित पवारांपुढे वाचला. शेतकर्‍यांच्या अडचणी समजावून घेत आ. पवार यांनी कांदा चाळीच्या रखडलेल्या अनुदानासंदर्भात थेट राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी पाठपुरावा केला, कृषी आयुक्त सुहास दिवसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कर्जतचे कृषी अधिकारी दीपक सुपेकर, जामखेडचे कृषी अधिकारी सुधीर शिंदे आदींच्या प्रयत्नातून ही रक्कम शेतकर्‍यांना मिळाली आहे.

यामध्ये अनुदान रखडलेल्या शेतकर्‍यांपैकी 83 शेतकर्‍यांचे 87,500 रुपयांप्रमाणे 72 लाख 62 हजार 500 रुपये अनुदान मंजूर करुन आणले असून अनुदानाची ही रक्कम लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमाही करण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्य व केंद्र सरकार आर्थिक संकटाचा सामना करीत आहे.असे असताना महाविकास आघाडीकडून सरकारकडून शेतकर्‍यांना टप्प्याटप्प्याने न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे असले तरी आ. रोहित पवार हे आपल्या सततच्या पाठपुराव्याने आणि कौशल्याने मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यास यशस्वी ठरले आहेत.

उर्वरीत शेतकर्‍यांचे रखडलेले अनुदानही काही दिवसांमध्ये आणण्याचा माझा प्रयत्न आहे. मतदारसंघातील कांदा उत्पादन हे दिवसेंदिवस वाढत असून शेतकर्‍यांच्या मालाची नासाडी होऊ नये, हमीभाव काळात वाटेल तेव्हा त्यांना आपला माल विकता यावा यासाठी पुढील काळातही आणखी कांदा चाळींना प्रोत्साहन देणार असल्याचे आ. रोहित पवार यांनी बोलताना व्यक्त केले.

कर्जत तालुका : 72 लक्ष 62 हजार 500 रुपये. जामखेड तालुका : एक कोटी 19 लक्ष 87 हजार 509 रुपये. कर्जत कांदाचाळ संख्या : 83 जामखेड कांदाचाळ संख्या : 137 कर्जत-जामखेड एकूण कांदाचाळ संख्या - 220 मिळालेली एकूण रक्कम : एक कोटी 92 लक्ष 50 हजार रुपये.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com