निलेश लंके
निलेश लंके
सार्वमत

आमदार निलेश लंके यांनी दिले पोलिसांना आव्हान

Arvind Arkhade

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नगर-कल्याण महामार्गावर असणार्‍या बाह्यवळण वासुंदे चौकात परिसरातील शेतकरी व व्यापारी भाजीपल्यासह शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येत असतात.

परंतु शनिवारी सायंकाळी व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांना टाकळी ढोकेश्वर येथील पोलिसांनी काठीने मारहाण केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याचा दम दिला असल्याची तक्रार एका शेतकरी महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांना करून फोनवरून कैफियत सांगितली.

तसेच आमचे वजनकाटे जप्त करत टाकळी पोलिसांनी चौकीला बोलाविले असल्याचे या पीडित महिलेने आ. लंके यांना रडत आपली व्यथा मांडली. आमदार लंके यांनी थेट महिलेच्या फोनला तातडीने प्रतिसाद देत टाकळी ढोकेश्वर येथील बायपास चौक दाखल झाल्यानंतर या महिलेसह शेतकरी व्यापार्‍यांची भेट घेत त्यांची कैफियत जाणून घेतली. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेत आ. निलेश लंके यांनी टाकळी ढोकेश्वर येथील पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस अधिकार्‍यांना बोलावत चांगलेच फैलावर घेतले.

करोनाच्या काळात वेळेचे बंधन जरी असले तरी शेतकर्‍यांची आपण लेकरं असून गरिबीची जाण आपणही ठेवली पाहिजे. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांनी या आपत्ती काळात या गरिबीची जाण ठेवून काम केले पाहिजे. तर दुसरीकडे आजही टाकळी ढोकेश्वर येथील गावात व परिसरात बड्या व्यापार्‍यांची दुकाने व हॉटेल सायंकाळी 5 वाजेनंतर मोठ्या प्रमाणावर चालू असून टाकळी ढोकेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तोंडे पाहून कारवाई करत आहेत.तसेच या महिलांसह शेतकर्‍यांचे जे वजनकाटे जप्त करण्यात आले होते ते तातडीने देण्याचे आदेश आ. लंके यांनी देण्यास सांगितले आहे.

तर दुसरीकडे या पोलीस कर्मचार्‍यांचे अनेक उद्योग पुराव्यानिशी आपल्याकडे आहेत, मला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा बरेच बाहेर येईल. त्यामुळे किमान शेतकरी व शेतीमाल व्यापारी यांच्याशी किमान संयमाने वागा अशा सूचनाही आ. निलेश लंके यांनी केल्या. यावेळी पोलिसांनी आ. लंके यांच्यासमोर मारहाण केली नसल्याचे स्पष्ट करताच उपस्थित सर्व स्तब्ध झाले.

या पोलीस कर्मचार्‍यांना जे खडेबोल आ. निलेश लंके यांनी सुनावले आहे, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आ. लंके यांच्या तातडीची मदतीची व दखलची चर्चा रंगली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक नेते जितेशभाई सरडे, कॉन्ट्रक्टर किशोर ठुबे, जालिंदर वाबळे, विलास ठुबे यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com