कोल्हापूर, नगर जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन शाळा
सार्वमत

कोल्हापूर, नगर जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन शाळा

मंत्रालयातील बैठकीत निर्णय : आमदार निलेश लंके यांची माहिती

Arvind Arkhade

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकार झालेला ऑनलाईन शाळा उपक्रम नगर जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यात प्रायोगिक पातळीवर राबविण्याचा निर्णय मंगळवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.

लॉकडाऊनमुळे गेल्या मार्च महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला असून त्यावर मात करण्यासाठी बहुतांश शिक्षकांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियाच्या या माध्यमास अनेक बंधने असल्यामुळे दिलेला अभ्यास विद्यार्थ्याने केला का? शिक्षकांनी दिलेल्या धड्यांचे विद्यार्थ्यांना अकलन झाले का? याबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

करोनाचा प्रादुर्भाव नेमका कधी आटोक्यात येणार याबाबत निश्चित कालमर्यादा नसल्याने घरी बसलेल्या विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने ऑनलाईन शिक्षण मिळावे ही संकल्पना आ. निलेश लंके यांनी मांडली. तंत्रस्नेही शिक्षक व दीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप गुंड यांच्या मदतीने ऑनलाईन शाळेसाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. दोन महिने सर्व बारीकसारीक गोष्टींवर सूक्ष्म अभ्यास करून विद्यार्थी व शिक्षकांसाठी सुटसुटीत सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली.

या सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण पारनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना देण्यात आल्यानंतर गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या सॉफ्टवेअरचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. पवार यांनी या सॉफ्टवेअरची माहिती घेउन शिक्षण तज्ज्ञांसोबत चर्चा करतानाच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंनाही या उपक्रमाची माहिती देऊन राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्याचा उपयोग करता येईल का हे तपासण्याच्या सूचना दिल्या होत्या.

गेल्याच आठवड्यात राळेगणसिद्धी येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तालुक्यातील या उपक्रमाचे उद्घाटन केले होते. त्याच वेळी राज्यात उपक्रम राबविण्यासंदर्भात 28 रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवारी मंत्रालयात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आमदार निलेश लंके, ग्रामविकास, नियोजन व वित्त विभाग यांचे अप्पर मुख्य सचिव, शिक्षण विभागाचे आयुक्त, नगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या उपस्थितीत एक तास बैठक पार पडली.

या बैठकीत मंत्री तसेच अधिकार्‍यांना या उपक्रमाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मंत्री, आमदार, तंत्रस्नेही शिक्षक तसेच अधिकारी यांच्यातील चर्चेनंतर नगरसह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही जिल्ह्यांतील शिक्षणाचा आढावा घेण्यात आल्यानंतर हा उपक्रम राज्यात राबविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com