
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
जीवन प्राधिकारणामार्फत राबविण्यात आलेल्या पाणी योजनेच्या लोकार्पणासाठी लावण्यात आलेली कोनशिला फोडून पोलीस कर्मचार्यास जखमी केल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यातून पारनेरचे आमदार नीलेश लंके यांची नगर येथील सत्र न्यायाधीश एम.आर.नातू यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
18 ऑगस्ट 2007 रोजी ही घटना पारनेर येथे घडली होती. सन 2004 पुर्वीचे तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार स्व. वसंतराव झावरे यांच्या कार्यकाळात पारनेर शहरातील ग्रामिण रूग्णालय तसेच पारनेर शहरास पाणी पुरवठा करणार्या पाणी योजनेस मंजुरी मिळून ती कामे सुरू झाली होती. परंतु यानंतर त्यांच्या पराभव होऊन शिवसेनेचे विजय औटी आमदार झाले होते. 18 ऑगस्ट 2007 रोजी स्व. वसंतराव झावरे यांनी ग्रामीण रूग्णालय व पाणी योजनेच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले होते.
स्थानिक आमदार म्हणून शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्याविरोधात तत्कालीन आमदार विजय औटी यांनी पारनेर येथे आमरण उपोषण सुरू केले होते. एकीकडे विजय औटी यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यावेळी आ. औटी यांचे प्रमुख कार्यकर्ते असेलेले नीलेश लंके, लाला साठे व इतर 20 जणांनी हंगा शिवारातील उद्घाटन समारंभाच्या ठिकाणी कोनशिलेवर दगडफेक करून ती फोडली. तेथे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पो. कॉ. जमदाडे व पो ना इधाटे यांना न जुमानता जमावाने दगडफेक करीत कोनशिला फोडून टाकली. दगडफेकीत प्रकाश जमदाडे हे जखमी झाले होते.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आ. लंके व इतरांवर गुन्हा सिध्द झाला नाही, साक्षीदारांच्या जबाबामधील तफावत लक्षात घेता पुरेशा पुराव्यांअभावी आ. नीलेश लंके व इतरांची निर्दोष मुक्तता केली. आ. लंके यांच्या वतीने अॅड. सतीश गुगळे, अॅड. युवराज पाटील, अॅड. राहुल झावरे, अॅड. स्नेहा झावरे, अॅड. गणेश दरेकर, अॅड. शिवदास शिर्के यांनी काम पाहिले.
बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आ. नीलेश लंके व माजी आ. विजय औटी यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत ही निवडणूक एकत्रीत लढवून सर्व 18 जागा खिशात घातल्या. गुरू-शिष्याचे मनोमिलन झाल्यानंतर गुरूच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःवर गुन्हा दाखल झाला तरी बेहत्तर या भावनेतून भूमिका घेणार्या आ. नीलेश लंके यांची गुरू-शिष्याच्या मनोमिलनानंतर गुन्हयातून निर्दोष मुक्तता झाली हा योगायोग मानला जात आहे.