तर रुग्णालयाचे इतरत्र स्थलांतर - आ. लंके

आमदार निलेश लंके
आमदार निलेश लंके

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर शहरात 1 हजार 100 कोटी रुपयांचे हे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे. परंतु या सामाजिक व विधायक उपक्रमाला राजकीय सुडातून विरोध होत असेल तर पारनेर शहर सोडून इतर ठिकाणी हे अद्ययावत रुग्णालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष विजय औटी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांच्या करोना काळात जवळपास 35 ते 36 हजार रुग्णांना खडखडीत बरे केले असून दिवसभरात किमान दहा तरी रुग्ण माझ्याकडे उपचारासाठी येत असतात. त्यामुळे उपचारासाठी नगर किंवा पुण्याला जाण्याऐवजी जर पारनेर शहरात अद्ययावत रुग्णालय उभारले तर आपल्या जनतेची सोय होईल.या उदात्त हेतूने रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न आहे.

मतदार संघातील लोकांचे आरोग्य व शिक्षण, बेरोजगारी यांना प्राधान्य देणार असून या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रात्री अपरात्री लोकांना मदतीचा हात देण्यासाठी हे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येत आहे. गोरगरीब व गरजू लोकांसाठी अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा मानस मी केला असून त्यादृष्टीने पारनेर येथे प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे काम सुरू करणार होतो. टाकळी ढोकेश्वर व परिसरातील व दुर्गम भागातील व नगर तालुक्यातील अनेक गावांसाठी अद्ययावत 500 बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार होते. सर्व शासकीय योजनांचा लाभ या रुग्णालयाच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. या रुग्णालयाच्या माध्यमातून उपचाराबरोबर रोजगार उपलब्ध होणार आहे.

नगरपरिषदेच्या 12 पैकी 2 लोक गैरहजर होते त्यामुळे या रुग्णालयाच्या उभारणीसाठी 10 नगरसेवक बरोबर आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष विजय औटी व इतर नगरसेवकांशी याबाबत चर्चा करून निर्णय घेतला आहे. परंतु राजकीय स्वार्थापोटी विरोध होत असेल तर अन्यत्र हलवणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.

अवैध धंदे करणारांचे योगदान काय ?

रूग्णालयास विरोध करणारांचे गावातील देवस्थानच्या जागेमध्ये हॉटेल व्यवसाय , दारूचे धंदे, तालमी सुरू करून समाज बिघडवण्याचे काम केले. या पाठीमागे राजकीय बळ विरोधक देत असून समाजाशी संबंध नसणार्‍या माणसांनी रुग्णालयास विरोध केला आहे. त्यांचे समाजासाठी योगदान काय? असा सवाल आमदार निलेश लंके यांनी उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com