पिक्चर अभी बाकी है !

आ. लंके यांचा विखे गटाला इशारा
आमदार निलेश लंके
आमदार निलेश लंके

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-राहुरीच्या कामात काही लोक ठेकेदाराकडून टक्केवारी मागतात, असा आरोप माझ्यावर व राहुरीचे आ.प्राजक्त तनपुरेंवर करण्यात आला. टक्केवारीचा आरोप सिद्ध केला तर आम्ही राजीनामे देतो, नाहीतर तुम्ही द्या, असे जाहीर आव्हान पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी खा.डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता पुन्हा एकदा दिला. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है...असा इशाराही त्यांनी दिला.

नगर-पाथर्डी-नांदेड निर्मल महामार्ग, नगर-राहुरी-शिर्डी-कोपरगाव रस्ता व नगर-मिरजगाव-चापडगाव-करमाळा- टेंभुर्णी महामार्ग या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी व नूतनीकरणासाठी आ. लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवस उपोषण आंदोलन केले. त्याची सांगता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी झाली. यानंतर आ. लंके समर्थकांनी जल्लोष केला. त्यांना खांद्यावर घेत उपोषणस्थळी त्यांची मिरवणूकही काढली. यावेळी प्रताप ढाकणे, क्षीतिज घुले, अशोक सावंत, संदेश कार्ले व विविध गावांतून आलेले ग्रामस्थ उपस्थित होते.

आ.लंके म्हणाले, आमचे आंदोलन म्हणजे स्टंट वा लोकसभा निवडणूक लढवण्याचा संदर्भ दिला जातो. पण लोकसभा निवडणुकीआधी पुलाखालून खूप पाणी वाहून जाणार आहे. मला आमदारकी मिळाली, हेच खूप झाले. जनतेच्या हृदयावर राज्य करीत असल्याने हे भाग्य मिळाले आहे, असे स्पष्ट करून आ. लंके म्हणाले, काहींनी माझी धास्ती घेतली आहे की, हा लोकसभेला उभा राहतो काय? त्यामुळे आमच्या उपोषण आंदोलनासाठी आरोग्य पथकही पाठवले नाही. जे पथक आले, त्यांना तेथे का गेला, अशी विचारणाही केली गेली.

त्यामुळे आम्हाला मारायचे टेंडर तर दिले नाही ना, असे वाटत होते. सत्तेचा गैरवापर केला जात होता. कोणीही आम्हाला भेटायला आले नाही व अधिकार्‍यांनाही येऊ दिले नाही. पण आता क्रांतीकारी झाले पाहिजे, असे आ.प्राजक्त तनपुरे यांनी मला सांगितले आहे. त्यामुळे ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है..., अशा शब्दात सूचक इशारा आ. लंके यांनी यावेळी दिला.

दक्षिण जिल्हा स्वतंत्र करा

यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनीही कोणाचेही नाव न घेता उत्तर नगर जिल्ह्यातील राजकारण्यांवर टीका केली. मागील 50 वर्षात उत्तरेतील नेत्यांनी दक्षिणेला दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची मस्ती आता काढावी लागणार आहे. जिल्हा परिषदेकडे येणार्‍या रुपयातील 70 पैसे उत्तरेत खर्च होतात व फक्त 30 पैसे दक्षिणेच्या वाट्याला येतात. सत्तेत राहूनही दक्षिण जिल्ह्याला सुकी भाकरी व चटणीही दिली नाही. त्यामुळे दक्षिण नगर जिल्हा स्वतंत्र करण्याची गरज आहे, असे भाष्यही ढाकणे यांनी केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com