विद्यमान सरकारच्या काळात वाचाळवीर वाढले

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टीका || आ. लंके यांचे उपोषण मागे
अजित पवार
अजित पवार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भाजपचे मंत्री, प्रवक्ते, राज्यपाल महापुरुषाविषयी अपशब्द वापरून नको ते वक्तव्य करतात. राज्य सरकारमधील एक आमदाराने शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भलताच शोध लावला. सरकारमधील मंत्री शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेच्या प्रसंगाचे उदाहरण देत शिंंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या सुरत, गुवाहाटी, गोवा या प्रवासाची तुलना करतात. त्यामुळे विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात राज्यात वाचाळवीर वाढले असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा दिलेला शब्द, विरोधी पक्ष नेते पवारांनी नगर शहरात येऊनही विखे पिता-पुत्रांवर टाळलेली टीका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी दिलेली लेखी आश्वासने यामुळे अखेर मागील चार दिवसांपासून नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे उपोषण आंदोलन मागे घेतले. जिल्ह्यातील महामार्गाच्या दुरुस्तीसाठी व नूतनीकरणासाठी आ. लंके यांच्यासह शिवशंकर राजळे, गहिनीनाथ शिरसाठ, हरिहर गर्जे, हरिदास जाधव, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, अशोक सावंत, अ‍ॅड. सतीश पालवे आदींनी चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

उपोषण संपल्यानंतर विरोधी पक्ष नेते पवार यांनी भाजप आणि राज्य सरकारचा समाचार घेतला. थोर पुरूष, शिवाजी महाराज यांच्या विषयी वक्तव्य करण्यासाठी मंत्री झालात की जनतेच प्रश्न सोडवण्यासाठी असा सवाल उपस्थित करत काय बोलता, कसे बोलता याचा काही मागमूस राहिलेला नाही. पूर्वीपासून महाराष्ट्रात सुसंस्कृत परंपरा राहिलेली आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची शिकवण अशी नव्हती. कर्नाटक सीमा प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारला पवार यांनी सुनावले.

यावेळी आ. संग्राम जगताप, घनश्याम शेलार, प्रताप ढाकणे, संदेश कार्ले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले तसे विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पुण्याचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिकचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे, पाथर्डी उपविभागाच्या उप अभियंता स्मिता पवार, नगर विभागाचे उप अभियंता दिलीप तारडे, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके-इनामदार, राज्य रस्ते प्राधिकरणाच्या तांत्रिक विभागाचे उपमहाप्रबंधक एम. एस. वाबळे आदी उपस्थित होते.

ना.गडकरींचे आश्वासन

चार दिवसांच्याआंदोलनामुळे वाढलेल्या तणवाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते पवार यांनी शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास नगरला येऊन उपोषणस्थळावरून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींशी फोनद्वारे संवाद साधला व रस्त्याचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. मी मुंबईला आल्यावर आपण याबाबत भेटून चर्चा करू तसेच दर आठवड्याला मी देशभरातील महामार्गांच्या कामांचा आढावा घेत असल्याने यापुढे नगर जिल्ह्यातील या तिन्ही रस्त्यांच्या कामांचा आढावा घेईल, असे आश्वासन गडकरींनी पवारांना दिले. या आश्वासनाची माहिती स्वतः पवारांनी जाहीर ध्वनीक्षेपकाद्वारे उपोषणकर्त्यांना दिली. याचवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी तिन्ही रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने कशी होतील, याची लेखी आश्वासन दिले. त्यानंतर पवारांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले.

विखेंवर टीका टाळली

शुक्रवारी सायंकाळी आ. थोरात यांनी लंकेंच्या उपोषणाला पाठिंबा देताना पालकमंत्री विखेंवर दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते पवारही पालकमंत्री विखेंवर टीका करतील, असे अंदाज व्यक्त केला जात होता. पण पवारांनी विखेंवर टीका टाळली. केंद्रीय मंत्री गडकरींनी शब्द दिला आहे. कामे एका झटक्यात होणारी नाहीत. पण ती थांबणार नाहीत. या विषयांचा पाठपुरावा आपणही करीत राहू, असे स्पष्ट करून पवार म्हणाले, नगर-शिर्डी व नगर-पाथर्डी या रस्त्यांची दुरवस्था आपणही अनुभवली आहे. 2016 मध्ये सुरू केलेले काम 2022 मध्येही पूर्ण होत नसेल तर उद्रेक वा आंदोलने होणारच. प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी कोणत्याही प्रश्नासाठी आंदोलन करण्याची वेळच येऊ द्यायला नको, असे पवार म्हणाले.

पालकमंत्र्यांना सूचक सल्ला

यावेळी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्ष नेते पवार यांनी पालकमंत्री विखेंचे नाव न घेता त्यांना सूचक सल्ला दिला. पवार म्हणाले, राज्यकर्त्यांनी राजकारण न आणता प्रश्नांकडे पाहिले पाहिजे. विकासकामांसाठी होणार्‍या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे हा जनतेचा अपमान आहे. जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे. चर्चेतून नक्कीच मार्ग निघत असल्याने चर्चा केली पाहिजे होती. तुम्हीपण जनतेचे लोकप्रतिनिधी आहात. त्यामुळे जनतेची भूमिका व प्रश्न मांडणार्‍यांशी चर्चा करायला हवी होती, असा सल्ला पवारांनी विखेंना दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com