डिजिटल शाळा उपक्रम राज्यासाठी पथदर्शक - आ. निलेश लंके
सार्वमत

डिजिटल शाळा उपक्रम राज्यासाठी पथदर्शक - आ. निलेश लंके

Arvind Arkhade

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येणारा ऑनलाईन शाळा उपक्रम राज्यातील प्राथमिक शाळांसाठी पथदर्शी ठरेल असा विश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व शिक्षण संस्था बंद असून त्यावर उपाय म्हणून ऑनलाईन शाळेचा उपक्रम तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या माध्यमातून आ. लंके यांनी हाती घेतला आहे. या डिजिटल शाळेसंदर्भात पारनेर नगर मतदारसंघातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत असून त्याचा समारोप पारनेर शहरातील सोबलेवाडी येथील जि. प. च्या शाळेत आ. लंके यांच्या उपस्थितीत पार पडला.

आता प्रत्यक्षात ऑनलाईन शाळेमार्फत विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, अ‍ॅड. राहुल झावरे, अरुण पवार, नगरसेविका विजेता सोबले, संभाजी औटी, आनंदा औटी, विजय औटी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपासून मतदारसंघातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून काही शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु विद्यार्थी खरोखर अभ्यास करतात का? शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विषय शिकविला का? याचा पाठपुरावा करता येत नसे. या माध्यमामध्ये अनेक त्रुटी निर्माण होत असल्याने संदीप गुंड यांच्या माध्यमातून ऑनलाईन शाळेसाठी स्वतंत्र सॉफटवेअर तयार करण्यात आले.

गेल्या दीड, दोन महिन्यांपासून त्यावर काम सुरू होते. विद्यार्थी अभ्यास करतो किंवा नाही, दिलेल्या अभ्यासापैकी किती प्रश्नांची उत्तरे त्याने दिली आहेत, त्याला काय अडचणी आहेत, किती विद्यार्थ्यांनी या प्रणालीचा लाभ घेतला याचा आढावा या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घेता येणार आहे. प्रत्यक्ष वर्गात दिलेल्या धड्यांप्रमाणेच विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळणार असून त्याच्या प्रगतीकडेही लक्ष देता येणार आहे.

मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या शाळांत 15 हजार विद्यार्थी असून 80 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अ‍ॅण्ड्रॉईड फोन आहेत. उर्वरीत 20 टक्के विद्यार्थ्यांना लोकसहभागातून मोबाईल उपलब्ध करून देण्याचे धोरण असून संबंधित गावांमधून त्यासाठी वर्गणी संकलित करण्यात येणार असल्याचे आ. निलेश लंके यांनी सांगितले.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com