
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
हल्ली विकास कामांची खोटी भुमिपूजने करण्याचा तालुक्यातील काहींनी धंदा सुरू केला असून आमची सोशल मीडियावर विकास कामांच्या मंजुरीची पोस्ट पडली की त्यावरील आमचा फोटो काढून त्यांचा फोटो लावून त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. कामे तुम्ही मंजुर करून आणा आणी श्रेयपण घ्या आम्ही काही म्हणणार नाही. अशी टिका आमदार नीलेश लंके यांनी सुजीत झावरे व राहूल शिंदे यांचे नाव न घेता केली.
तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे ते बोलत होते. काही दिवसांपुर्वी वडनेर हवेली येथील एका भूमिपूजनावरून गोंधळ झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांवर टिका केली. यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, आम्ही विकास कामांसाठी मोठा निधी आणला. विरोधक मात्र आमच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. रस्त्यांच्या कामांचेही श्रेय घेण्याचा कालच प्रयत्न झाला. वडनेर हवेलीमध्ये सरपंचाने दोन, चार लोक सोबत घेऊन स्वतःच फलक लावला.
1 कोटी 55 लाख रूपयांचा निधी सरपंच कोठून आणणार? रांजणगांवकर ज्यांना आयुष्यात कधी गुलाल मिळाला नाही ते तेथे चार सहा लोकांना घेऊन नारळ फोडायला आले होते. यापूर्वीही अधिकार्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जायचा. आता मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत. त्यामुळे अधिकारीही दबावाला न जुमानता आमच्या कार्यक्रमांना येऊ लागले असल्याचे सांगत लंके यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले.
यावेळी बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पारनेरचे उपनगराध्यक्ष राजू शेख, अर्जुन भालेेकर, विजय पवार, दिपक पवार, संदीप सालके, भाऊसाहेब भोगाडे, अमोल यादव, अशोक रोहोकले, विक्रमसिंह कळमकर, अशोक घुले, वैभव गायकवाड, कारभारी पोटघन, सतिश भालेकर, उमा बोरूडे, पुनम मुंगसे, सुनिल करंजुले, श्रीकांत चौरे, अनिल गंधाक्ते, दिपाली औटी, पाकीजा शेख, संदीप चौधरी, अमित जाधव, सरपंच मंगल गट,उपसरपंच सुनील पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक नेते चंद्रकांत गट व कवी अशोक पवार यांनी तर सूर्यकांत गट यांनी आभार मानले.
विरोधात असतानाही निधी आणला
सत्तेची गणिते काहीही असोत मागील वर्षी विरोधात असूनही आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनातून 73 कोटींचा निधी खेचून आणला. विरोधात असताना कधी प्रेमात तर कधी उपोषण करून निधी मिळविला.अजित पवार यांच्या माध्यमातून आपण कोटयावधी रूपयांचा निधी खेचून आणला. इतका निधी उपलब्ध झाला आहे व होणार आहे की, माझ्या पहिल्या आमदारकीची टर्म संपेपर्यंतही या कामांची भुमिपूजने संपणार नाहीत असे लंके म्हणाले.