आमदार लंके उभारणार हजार बेडचे कोव्हिड सेंटर
सार्वमत

आमदार लंके उभारणार हजार बेडचे कोव्हिड सेंटर

Arvind Arkhade

पारनेर|तालुका प्रतिनिधी| Parner

करोना योद्धा अशी संपूर्ण राज्याला ओळख असलेले पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात 1000 बेडचे सुसज्य अद्ययावत कोव्हिड केअर सेंटर उभे करण्यात येणार आहे.

स्वखर्चातून उभे राहणारे अशाप्रकारचे हे राज्यातील पहिलेच कोव्हिड सेंटर ठरणार आहे. आमदार लंके यांनी करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातून जाणार्‍या परप्रांतीयांना मदतीचा मोठा हात दिला. यामध्ये निवारा, भोजन तसेच परप्रांतीयांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था देखील आमदार यांनी केली होती.

लॉकडाऊनच्या काळात आ.लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुमारे साडेतीन लाख गरजुंना अन्नपाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे त्यांचा नावलौकिक राज्यात करोना योद्धा असा झालेला आहे. आमदार लंके व त्यांच्या प्रतिष्ठानचे राज्यातील राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेते मंडळींनीही कौतुक केले आहे.

मार्च महिन्यापासून आ.लंके करोना विरोधी लढ्यात राज्यात आघाडीवर आहेत. करोनाच्या जीवघेण्या संकटात लाखो स्थानिक व परप्रांतीय नागरिकांना निवारा, भोजन व प्रवास व्यवस्था आमदार लंके यांच्याकडून करण्यात आली होती. परराज्यातील खासदार, आमदार तसेच मंत्र्यांकडूनही लंके यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून आमदार लंके यांचे कौतुक होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com