तुटपुंजी नको खास बाब म्हणून भरीव मदत द्या

आ. राजळेंची मुख्यमंत्री, मदत पुनर्वसन मंत्र्यांकडे मागणी
तुटपुंजी नको खास बाब म्हणून भरीव मदत द्या
आमदार मोनिका राजळे

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी व शेवगाव तालुक्यात जोरदार अतिवृष्टी होऊन नागरिकांचे जमीन, उभे पीक, जनावरे, घरे असे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर न करता खास बाब म्हणून शासकीय निकष बाजुला ठेवून सरसकट पंचनामे करून पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

राजळे यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पाथर्डी व शेवगाव तालुक्यात 30 ऑगस्टच्या मध्यरात्री जोरदार अतिवृष्टी झाल्याने नद्या व नाल्यांच्या पुरामुळे अनेक गावे, वाड्या, वस्त्या, पाण्याखाली गेल्याने हजारो कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले. शेवगाव तालुक्यातील वडुले येथील कै.मुरलीधर सागडे हे पुराच्या पाण्यात वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. शासनाने मृत सागडे कुटुंबियांना किमान पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत द्यावी तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. शासनाच्या नैसर्गिक आपत्तीसाठी मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत घरांची पडझड, शेतीचे व शेती पिकाचे नुकसान, फळबाग नुकसान, जनावरांचा मृत्यू यासह शेतीपिकांचे नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारकडून अत्यंत तुटपुंजी आर्थिक मदत दिली जाते.

त्याऐवजी सातत्याने दुष्काळी व ऊस तोडणी शेतकरी मजुरांच्या पाथर्डी,शेवगाव तालुक्यावर कोसळलेल्या या भयानक संकटात राज्य सरकारने खास बाब म्हणून सर्व शासकीय निकष बाजुला ठेवून आपत्तीग्रस्तांना भरीव आर्थीक मदत जाहीर करावी. शेतकर्‍यांना हेक्टरी किमान 25 हजार रुपये आर्थिक सहाय्य, घरांची पडझड झालेल्यांना किमान निवार्‍यासाठी पत्र्याचे घर,गुरांचे गोठे बांधून द्यावेत. लाखो रुपये किमतीच्या म्हशी, गाई, बैल, शेळ्या, मेंढ्या, वाहून गेल्या त्यांना बाजारमूल्याच्या भावाने जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. तरच पाथर्डी,शेवगाव या दुष्काळी व ऊस तोडणी मजूर शेतकर्‍यांच्या उद्ध्वस्त संसाराला थोडासा हातभार लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासकीय निकष बाजुला ठेवून खास बाब म्हणून दोन्ही तालुक्यांतील अतिवृष्टीने बाधित झालेल्यांना जास्तीत जास्त मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com