तालुका प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत
सार्वमत

तालुका प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत

आ. मोनिकाताई राजळे यांच्या करोना आढावा बैठकीत सूचना

Arvind Arkhade

पाथर्डी|तालुका प्रतिनिधी|Pathardi

शहरासह तालुक्यातील करोना साथरोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने आ. मोनिकाताई राजळे यांनी तालुका प्रशासनाची बैठक आयोजित करून सविस्तर आढावा घेतला. तसेच उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या.

प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कराळे आदी उपस्थित होते.

आ. राजळे यांनी करोना संदर्भात तालुक्यासह शहरातील सविस्तर आढावा घेतला, आजपर्यंत तालुक्यात एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 352 असून त्यापैैकी 180 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तीन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 169 रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनाचा वााढता प्रादुर्भाव पाहता यापुढील काळात करोना आटोक्यात आणण्यासाठी तालुका प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, उपजिल्हा रुग्णालयात सध्या 50 बेडची व्यवस्था असून तेथे 100 बेडची व्यवस्था करण्यात यावी.

श्री तिलोक जैन विद्यालयातील कोव्हिड सेंटर येथे सध्या 100 बेडची व्यवस्था असून तेथेही 150 बेडची व्यवस्था करावी, त्याचप्रमाणे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची संख्या वाढविण्यात यावी. शहरातील डॉक्टर्स, केमिस्ट, व्यापारी, दुकानदार यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीची व नातेवाईकाच्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट घेण्यात याव्यात, शहरात फिरणार्‍या नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वापरणे बंधनकारक करावे.

करोना साथरोग आटोक्यात आणण्यासाठी सर्वच अधिकारी, कर्मचारी प्रशासकीय यंत्रणानी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी. करोना बाधित रुग्णांना भोजन, औषधोपचार आदी सुविधा वेळेवर देण्यात याव्यात, प्रत्येक रुग्णाची काळजीपूर्वक दखल घ्यावी आदी सूचना आ. मोनिकााई राजळे यांनी बैठकीत प्रशासनास केल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com