सण, उत्सव आनंदाने साजरा करुन आनंद द्विगुणीत करा - आ. कानडे

रमजान ईद व अक्षय्यतृतियेच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी बैठक
सण, उत्सव आनंदाने साजरा करुन आनंद द्विगुणीत करा - आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरात सर्व जाती धर्माचे, सर्व पंथाचे लोक एकत्रित राहत असल्याने याठिकाणी एकता दिसते. सर्वांनी मानवता हा एकच धर्म मानला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने एक सर्वात्तम मानवी मुल्ये दिली. कोणत्याही धर्माचा उत्सव, सण हा मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे. समाजातील विघातक कृत्ये करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. सर्वांना सोबत घेवून शांततेत रमजान ईद व अक्षय्य तृतियेचा सण साजरा करुन आनंदद्विगुणीत करावा, असे आवाहन आ. लहू कानडे यांनी केले.

पोलीस विभागाच्यावतीने काल प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात रमजान ईद व अक्षय्यतृतियेच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस अधिक्षक संदिप मिटके, पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, आरटीओचे अधिकारी ए. आर. ढगळे, पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, माजी नगरसेवक अंजूम शेख आदी उपस्थित होते.

आ. कानडे म्हणाले, जो कायद्याच्या विरोधात काम करत असेल त्याला प्रतिबंध केला पाहिजे. श्रीरामपुरातील जी विविधता आहे ते आमचे सौंदर्य आहे. या विविधेत आम्हाला आनंदाने राहाता यावे व या शहराची संस्कृती अबाधित ठेवू या असे आवाहनही त्यांनी केले.

अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर म्हणाल्या, ईदगाह मैदानाकडे जाणार्‍या रस्त्यावर खड्डे आहेत ते पालिकेने बुजवावेत. तसेच रमजान व अक्षय्यतृतियेनिमित्त घराबाहेर पडणार्‍या स्त्रियांच्या संरक्षणासाठी पोलीस कार्यवाही करतील. तुम्ही दिलेल्या तक्रारींची दखल घेवून कायद्याच्या चौकटीत राहून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल ती बोलून दाखविण्याची गोष्ट नाही. सध्या लाऊडस्पिकरच्या बाबतीत आम्ही सर्व धार्मिकस्थळांच्या प्रमुखांच्या बैठका घेवून किती आवाज असावा हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना समजावून सांगितले. ज्यांनी परवानगी घेतली नसेल त्यांनी परवानगी घ्यावी. हा विषय जास्त वादाचा न करता सर्वसंमतीने यावर तोडगा काढला जावा. सर्वांनी रमजान ईद व अक्षय्य तृतियेचा सण मोठ्या आनंदाने साजरा करावा, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके म्हणाले, पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम नेहमीच करत असतात. प्रत्येक सण, उत्सव लक्षात घेवून जे त्रासदायक असतील त्यांचेवर नजर ठेवण्याचे काम करतात. श्रीरामपूर शहरात 144 कलमान्वये 39 लोकांचे प्रस्ताव तयार केले असून प्रांताधिकार्‍यांनी ते सर्व मंजूर केले आहेत. तसेच 24 हद्दपारीचे प्रस्ताव तयार करुन ते प्रांताधिकार्‍यांकडे दिले असून त्यांना 24 पैकी 22 प्रस्ताव मंजूर केले आहेत. प्रत्येक जण धर्माकरता मरायला तयार असतात परंतु धर्माचे पालन करायला कोणीच तयार नसतो. धर्म काय आहे याची परिपूर्ण माहितीही घ्यायला तयार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मनसेचे बाबा शिंदे, गणेश भिसे, राष्ट्रवादीचे कैलास बोर्डे, मुजफ्फर शेख, आरपीआयचे सुभाष त्रिभूवन, भाजपाचे प्रकाश चित्ते यांची भाषणे झाली.

Related Stories

No stories found.