खते, बियाणांचा तुटवडा होणार नाही याची काळजी घ्या

खरीप हंगाम आढावा बैठकीत आ. कानडे यांच्या अधिकार्‍यांना सूचना
खते, बियाणांचा तुटवडा होणार नाही याची काळजी घ्या

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना खते, बियाणे तसेच औषधांचा तुटवडा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, तालुक्यात हवामान केंद्राची संख्या वाढविण्याबाबत प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करावा, अशा सूचना आ. लहू कानडे यांनी केल्या.

श्रीरामपूर तालुक्यातील खरिपाच्या 2021-22 हंगामाची पूर्व आढावा बैठक ऑनलाईन पध्दतीने आ. लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे, तालुका कृषि अधिकारी अशोक साळी, श्रीरामपूर तालुका कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, कृषि निविष्ठा खते-बियाणे विक्रेते, श्रीरापूर तालुका पंचायत समितीचे सदस्य व अधिकारी वर्ग उपस्थित होते. बैठकीत कृषीविषयक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

खरीप हंगामाचे पेरणी क्षेत्र, पीकनिहाय नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. तालुक्यात खरिपाचे 24 हजार 610 हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट असून त्यात सोयाबीनची सर्वाधिक 12, 735 हेक्टर पेरणीचे नियोजन आहे. त्या खालोखाल कपाशी, मका, बाजरी, भुईमूग, तूर, मूगाची पेरणी होण्याची शक्यता आहे. पेरणीच्या प्रमाणात बियाणांची मागणी करण्यात आली आहे. पेरणीसाठी बियाणांचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. सोयाबीनच्या 9,551 क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार खत विक्री पॉस मशिनवर नोंदविणे चालू असून खत खरेदीसाठी शेतकर्‍यांचा मोबाईल नंबर आधारकार्ड लिंक करून देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

श्रीरामपूर तालुक्यात कृषी विस्तार विषयक बिबिएफ पध्दतीने सोयाबीनची पेरणी, हुमणी अळी नियंत्रण, सोयाबीन उगवण क्षमता चाचणी, सोयाबीन बीज प्रक्रिया, मूलस्थानी जलसंधारण, मका पिकावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रण, रासायनिक खत वापरामध्ये 10 टक्के बचत याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी अधिकार्‍यांनी दिली.

विनाअनुदानित तत्त्वावर सोयाबीन बीज प्रक्रिया मोहीम याबाबत आ. लहू कानडे यांनी मार्गदर्शन केले. तालुक्यामध्ये किती शेतकर्‍यांना किती रक्कमेचा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. याबाबतचा तपशिल संबंधित बँकांंच्या अधिकार्‍यांकडून प्राप्त करून घेण्याबाबत त्यांनी सूचित केले.

श्रीरामपूर तालुक्यात 4 स्वयंचलित हवामान केंद्र कार्यरत असून, त्यांची संख्या वाढविण्याबाबत व प्रति मंडळ किमान तीन स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठवावा तसेच याबाबत पाठपुरावा करावा, असेही आ. कानडे यांनी सुचविले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com