योजना कागदावर न ठेवता थेट शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवा - आ. कानडे

खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक संपन्न
योजना कागदावर न ठेवता थेट शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवा - आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कृषी अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांसाठी ज्या नवीन योजना येत असतात त्या केवळ कागदावर उतरवू नयेत तर त्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागातील फिल्ड वर्कवर काम करणार्‍यांनी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन पदाधिकार्‍यांचा सहभाग नोंदवावा तरच या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचू शकतील, असे आवाहन आ. लहू कानडे यांनी केले.

श्रीरामपूर प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकित ते बोलत होते.यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील, अरुण नाईक, डॉ. वंदना मुरकुटे,अशोक कानडे, गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस, कृषी अधिकारी अशोक साळी आदींसह अनेक अधिकारी, पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक तसेच कृषी सेवा केंद्र चालक उपस्थित होते. ऊस तोड लवकर न मिळाल्याने व कापसालाही चांगला भाव मिळाल्याने शेतकरी उसाकडून कापसाकडे वळत आहेत.

खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना बी बियाणे वेळेवर मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अधिकार्‍यांनी कृषी केंद्राला भेटी द्याव्यात, बनावट बियाणे, जुने बियाणे विकले जाते का? हे पण तपासले पाहिजे. सोयाबीन बियाणाचा दर जास्त असल्याने शेतकर्‍यांनी स्वतः बियाणे तयार केले पाहिजे. त्यासाठी कृषी विभागाने ज्या शेतकर्‍यांकडे बियाणे आहेत त्यांची उगवण क्षमता तपासली पाहिजे. उगवण क्षमता तपासल्याचे अहवाल सादर करावेत. कृषी विभाग व शेतकरी समन्वय असला पाहिजे, असे आवाहन करत या सभेला कृषी विभागाने अनेक लोकांना आमंत्रित केले नाही म्हणून नाराजी व्यक्त केली. तालुक्यातील काही प्रगतशील व पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यांनाही सहभागी करुन घेणे महत्वाचे आहे. गावातील ग्रामपंचायत सरपंचांनाच या योजनेची माहिती नसते त्यामुळे अशा बैठकांमध्ये ते काय बोलणार व काय माहिती घेणार? असा सवालही त्यांनी केला.

यावेळी कृषी अधिकारी यांनी माहिती देताना खरीप हंगामात बी-बियाणाची परिस्थिती विशेष केली असता बाजरी-0.96 टन, मका 220 टन, तूर 0.12, भुईमूग 25, सोयाबीन 715 टन असे एकूण 961 टन बियाणाची गरज असून 47 हजार कापसाची पाकिटे आहेत. खताची परिस्थिती सांगितली असता युरीयाची 5417 मागणी असून 3883 उपलब्ध, डीएपी 1387 मागणी असून 1240 उपलब्ध, एमओपी-827 मागणी 425 उपलब्ध, एसएसपी 1730 मागणी असून 1828 उपलब्ध आहे तर एनपीके 4107 मागणी 3645 उपलब्ध असे एकूण 13466 मे. टन खतांची मागणी असून केवळ 1022 उपलब्ध असल्याची माहिती साळी यांनी दिली.

यावेळी आ. कानडे म्हणाले की, शेतकर्‍यांना जादा दराने खते दिली जाऊ नये म्हणून दुकानदारांची मागणी नोंदवून घ्या, त्याबाबत काही अडचण असल्यास ती नमूद करून घ्याव्या. बियाणे मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यासाठी दुकानांची पहाणी केली पाहिजे. सोयाबीनचे बियाणे शेतकर्‍यांची स्वतः तयार करावीत. तसेच कृषी अधिकार्‍यांनी या बियाणांची उगम क्षमता तपासून त्याची चाचणी करून पहावी. फिल्डवरील कर्मचारी व्यवस्थित माहिती घेत नाही, खोटे नाटे माहिती घेत असल्याचे आढळून आले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना नाव मोठ लक्षण खोट अशी ठरली आहे. शेतकर्‍यांनी पीक विमा कंपनीकडे जी रक्कम भरली आहे त्या पटीत त्यांना रक्कम मिळते काय? असा सवाल केला. त्याची आकडेवारी मागितली असता ती कृषी अधिकार्‍यांकडे या बैठकीत उपलब्ध नव्हती. त्यामुळे आमदारांनी कृषी अधिकार्‍यांच्या या अर्धवटपणाबद्दल नाराजी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.