‘कमळा’च्या उपरण्याने केली मा.आ.कांबळे यांची गोची

आ. कानडे यांची ‘जन की बात’
‘कमळा’च्या उपरण्याने केली मा.आ.कांबळे यांची गोची

बेलापूर | Belapur

काल एकलहरे आणि बेलापूर येथील आयोजित केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनच्या कार्यक्रमास उपस्थित माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या गळ्यातील भाजपचे कमळाचे उपरणे .... आणि काँग्रेस आ. लहू कानडे यांची ‘जन की बात’ हे हजरजबाबी भाष्य चर्चेचा विषय ठरला!

यावेळी शिवसेना उद्घव ठाकरे गटाचे माजी आ.भाऊसाहेब कांबळे गळ्यात भाजपचे कमळाचे उपरणे घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम पाहत बसले होते. ते सर्वांचे लक्षवेधी ठरले. छायाचित्रकार आपले फोटो काढीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी हळुहळू बाजुला सरकावीत गळ्यातील उपरणे काढून दुसर्‍याला घालायला दिले आणि सुटकेचा निःश्वास सोडला खरा.. पण तोवर ते कॅमेर्‍यात बंदिस्त झाले होते. हे सर्व उपस्थित गंमतीने न्याहाळीत होते. मात्र कांबळे यांची आवर्जून उपस्थिती आणि गळ्यात कमळाचे उपरणे पाहून भुवया उंचावित अनेक राजकीय धुरंधर मंडळी 2024 चे तर्कवितर्क लावण्यात मग्न होती.

सरळमार्गी स्वभावाच्या माजी आ. भाऊसाहेब कांबळे मामांच्या गळ्यात हे उपरणे सहजपणे कोणी घातले की त्यांनी स्वतःहुन घालुन घेत पुढील काही संकेत देण्याचा प्रयत्न केला? याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. मंचावरील कार्यक्रमात मात्र त्यांच्या गळ्यात उपरणे नव्हते. चर्चेचे कारण एवढेच की,एकीकडे त्यांचे नेते उद्धव ठाकरे आणि नेतेमंडळी हे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील शिंदे - फडणवीस सरकार खाली खेचण्यासाठी सतत टोकाची टीका करीत असतात.

‘मन की बात’ आणि आ. लहु कानडे ...

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. आणि काँग्रेस आ. लहू कानडे एकलहरे येथील जलजीवन मिशनच्या कार्यक्रमात एकत्र होते. ना.विखे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ पहायला चला असे त्यांना सूचित केले. बेलापूर येथील नियोजित जलजीवन मिशनच्या कार्यक्रमाआधी सद्गुरू कार्यालयात स्क्रीनवर कार्यक्रम सुरु झाला तरी आ. लहुजी कानडे कुठे दिसले नाहीत. कार्यक्रम संपताच ते बरोबर साडेअकरा वाजता मंचावर आले. तो धागा धरुन ना. विखे यांनी आ. कानडे यांनी ‘मन की बात’ पहायला पाहिजे. तुमच्या विचारात बदल होईल.असे भाषणात म्हणताच मंचावर उपस्थित हजरजबाबी आ. कानडे यांनी मी लोकांच्या अडीअडचणी म्हणजे ‘जन की बात’ ऐकण्यासाठी आणि त्या सोडविण्यासठी बाहेरच होतो, असे म्हणताच एकच हशा पिकला. आ. कानडे यांनी पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक अनुपस्थित राहणे पसंत केले. याचीही चर्चा रंगली होती.

सरकार पक्षाचे शिंदे गटाचे शिर्डीचे शिवसेना खा. सदाशिव लोखंडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असुनही त्यांच्यापर्यंत भाजपचे उपरणे पोहोचलेले दिसले नाही, हेही विशेषच.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com