आमदार कानडे यांनी वीज वितरण अधिकार्‍यांच्या कामाचा फाडला बुरखा

पैसे घेऊन काम करत असल्याचा शेतकर्‍यांचा आरोप || रोहित्रांची दुरवस्था || वीज चोरी जोरात
आमदार कानडे यांनी वीज वितरण अधिकार्‍यांच्या कामाचा फाडला बुरखा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील वीज वितरण व अधिकार्‍यांच्या कामकाजाबाबत आ. लहू कानडे यांनी नाराजी व्यक्त करत. जे रोहित्र नादुरुस्त आहेत ते दुरुस्त का केले जात नाही? शेतकर्‍यांनी स्वतः पैसे खर्च करून रोहित्रे दुरुस्त केली तरी अधिकारी कर्मचारी पैसे का घेतात? रोहित्रांवर जादा लोड का येतो याची तपासणी का केली जात नाही. तसेच वीज चोरी रोखण्यासाठी अधिकारी प्रयत्न का करत नाहीत, असे एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करत वीज वितरण अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कामाचा बुरखा फाडला.

मागील थकबाकीच्या कारणावरून शेतकर्‍यांची वीज कनेक्शन तोडू नयेत, केवळ चालू बीले भरून घ्यावीत, यासह विजेच्यासंबंधी अनेक सूचना आ. लहू कानडे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना केल्या.

मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांबाबत आ. कानडे यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून आ. कानडे बोलत होते. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता भंगाळे, उपअभियंता डी. एन. चावडा, देवळाली प्रवराचे उपअभियंता पी. एच. देहरकर, बाभळेश्वर सबस्टेशनचे उपअभियंता व्ही. बी. सोनवणे, तसेच ममदापूर, बेलापूर, सूतगिरणी, श्रीरामपूर, बाभळेश्वर, देवळाली, हरेगाव, एमआयडीसी, कोल्हार सेक्शनचे सर्व शाखा अभियंता उपस्थित होते. बैठकीत रोहित्रे जळणे, महावितरणच्या अधिकार्‍यांकडून सहकार्य न होणे, शेतकर्‍यांना स्वखर्चाने रोहित्रे उभारावी लागणे, वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, नवीन डी. पी. न मिळणे, लाईन शिफ्ट करणे इ. अशा अनेक तक्रारी आ. कानडे यांच्या आवाहनानुसार ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी सादर केल्या होत्या. या तक्रारी व प्रश्न लोकांसमक्ष अधिकार्‍यांसमोर मांडण्यात आले. याबाबत श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात किती मिटर बंद आहेत असे विचारले असता सुमारे 8 हजार मिटर बंद आहेत. असे उत्तर अधिकार्‍यांकडून मिळाले. हा आकडा ऐकून आमदार आवाकच झाले.

डीपी ओव्हरलोड असल्याच्या तक्रारीबाबत आ. कानडे म्हणाले, ओव्हर लोड डीपी का आहे याची तपासणी करण्याचे काम कोण करणार? या तालुक्यातील शेतकरी वर्गणी गोळा करून डीपी बसविणे अथवा दुरुस्त करण्याचे काम करत असतात. एवढेच नव्हे तर अधिकारी लोक पैसेही मागत असतात असा आरोप अनेक शेतकर्‍यांनी केला.ठेकेदारांकडून कामे करून घेतली जात नाहीत. ठेकेदार स्वतःच्या मर्जीने काम करत असेल तर तो आपला मालक आहे का? मी जर प्रत्येक गावात चार कार्यकर्ते यावर लक्ष ठेवण्यासाठी ठेवले तर तुम्हा अधिकार्‍यांची पळताभूई थोडी होईल.

आ. कानडे यांनी, मतदारसंघातील सेक्शननिहाय डी. पी. किती आहेत, ओव्हरलोड किती आहेत? अधिकृत कनेक्शन किती आहेत? अनधिकृत कनेक्शन किती आहेत? नियमापेक्षा अधिक हॉर्स पॉवर्स मोटर्स किती आहेत? याची तपशीलवार माहिती संकलीत करून 100 डी. पी. नव्याने बसवून ओव्हरलोड डीपीवरील ग्राहकांना दिलासा द्यावा, सेक्शननिहाय मेंटेनन्सच्या कामांचा सर्व्हे करून मेंटेनन्स ऑर्डर्स देऊन नियोजनपूर्वक कामे करून घ्यावीत, शेतकर्‍यांची कनेक्शन मागील थकबाकीसाठी तोडू नयेत, केवळ चालू बील भरून घ्यावेत, जेथे मीटरची मागणी आहे तेथे मिटर बसविण्यासाठी नवीन मिटर मागवावेत, ग्राहकांना त्रास देऊ नये, अशा सूचना केल्या.

बैठकीस काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, सतीश बोर्डे, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, बाबासाहेब कोळसे, रवींद्र आमले, राजेंद्र कोकणे, कार्लस साठे, अण्णासाहेब ढोणे, राधाकृष्ण तांबे, भैय्या शाह यांच्यासह अन्वर बागवान, संजय भुजाडी, श्रीधर खंडागळे, तसवर बागवान, संजय रासकर, शाकीर बागवान, शोएब बागवान, सचिन येवले, अशोक पटारे, राजेंद्र भांड, रवींद्र आमले, सुदाम भांड, आशिष शिंदे, संजय भोसले, दत्तात्रय तांबे, नामदेव गाडेकर, राजेंद्र भोसले, सुनील गोरे, सुनील गायधने, मल्हारी खिळे, गोविंद अण्णासाहेब आदिक, अमोल आदिक, शिवाजी आदिक, गणेश आदिक आदी ग्रामस्थ तक्रारींसह उपस्थित होते.

शेतकरी व सर्वसामान्य आपल्या अडचणी व तक्रारी घेऊन कार्यालयात गेले तर अधिकारी वर्ग त्यांच्याशी उर्मटपणे वागतात. मराठीत बोलू नका हिंदीत बोला असे दम भरतात. जर कार्यालयात या अधिकार्‍यांकडून शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय मिळत्त नसेल तर शेतकर्‍यांनी दाद मागण्यासाठी जायचे कुठे? असा सवालही यावेळी करण्यात आला. त्याचमुळे ही जनसुनवाई घेण्यात आली असल्याचे आ. लहू कानडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com