दोघांविरोधात गरळ ओकणे बंद करा..का म्हणाले आमदार लहामटे

दोघांविरोधात गरळ ओकणे बंद करा..का म्हणाले आमदार लहामटे

अकोले |प्रतिनिधी| Akole

राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे अकोले तालुक्यासाठी कायमच मोठे योगदान आहे.

ते नाकारता येणार नाही, पण सध्या जो सोशल माध्यमात आमच्या दोघांच्या विरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो अतिशय खेद जनक आहे असे मत आ. डॉ. किरण लहामटे यांनी केले.

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अकोले येथील आढावा बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रवी मालुंजकर यांनी गोंधळ घातल्या वरून आरोप प्रत्यारोप सूरु आहे. या चुकीच्या गोष्टीमुळे राज्यभर चुकीचा मेसेज जात आहे. सोशल माध्यमातून या संदर्भात चुकीचे मेसेज फिरत आहेत. याबद्दल आ.डॉ.लहामटे यांनी नाराजी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस च्या तालुक्यातील नेते मंडळींनी काल पत्रकार परिषद घेत आ. किरण लहामटे यांचेवर टीका केली होती. या संदर्भात लहामटे हे पत्रकारांशी बोलत होते.

त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्ते स्वतःच्या नेत्यांच्या समर्थनार्थ सध्या एकमेकावर सोशल माध्यमात तुटून पडले आहेत. त्यामुळे सध्या संगमनेर-अकोले असा दुजाभाव केला जात असल्या बद्दल आ डॉ. लहामटे यांना खंत व्यक्त केली.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे अकोले तालुक्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यांचा आणि माझा येण्याच्या अगोदरच संपर्क झाला होता. त्यांनी अकोले तालुका असेल किंवा संगमनेर तालुका असेल असा कधी दुजाभाव केला नाही. अकोले तालुक्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचीही ग्वाही ना.थोरात यांनी दिली आहे. त्या आढावा बैठकीत जो गोंधळ झाला.

याचे मी नक्कीच समर्थन करणार नाही. त्या व्यक्तीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या पण त्या व्यक्त करण्याची पध्दत नक्कीच चुकली होती. त्याबद्दल मी त्यांना समजही दिली आहे. आणि त्या विषयी ना.थोरात यांच्याशीही मी चर्चा केली आहे. तरी काही नेते व कार्यकर्ते त्या प्रकरणाला वेगळे वळण देत आहेत.

हे खुप क्लेशदायक आहे आणि माझी काम करण्याची पद्धत जनतेत जाऊन त्यांना मदत करण्याची असल्याने हे काहींना पटणारे नाही. पण सध्या चालू असलेला कठीण काळ बघता मी कोणत्याही गोष्टीचे राजकारण करणार नाही. मला प्रथम तालुक्यातील जनतेचे आरोग्य महत्वाचे आहे. तरी कुणीही चुकीच्या पद्धतीने राजकारण करू नये असे आवाहन आ डॉ लहामटे यांनी केले आहे.

ना. थोरात यांनी कोणत्याही प्रकारचा अकोले तालुक्या विषयी दुजाभाव केला नाही, कारण ते राज्याचे नेते आहेत. राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी कोणतेही चुकीचे मेसेज सोशल माध्यमात फिरवू नये. असे आवाहन डॉ. लहामटे यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com