500 रुग्णांसाठीचे अद्ययावत कोव्हिड केअर सेंटर सुरू : आ. कानडे

500 रुग्णांसाठीचे अद्ययावत कोव्हिड केअर सेंटर सुरू : आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील 100 रुग्णांसाठीचे कोव्हिड सेंटर अपुरे पडत असल्याने

200 बेड्सची सुविधा असणारे आदिवासी मुलांचे वसतिगृह आणि 200 बेड्सची सुविधा असणारे आदिवासी मुलींचे वसतिगृह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे आता 500 रुग्णांसाठीचे अद्ययावत कोव्हिड सेंटर सुरू झाले असल्याची माहिती आ. लहू कानडे यांनी दिली.

कानडे यांनी सांगितले की, तालुक्यामधील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आपण वारंवार प्रशासनाच्या बैठका घेत मुख्य पदावरील अनेक पदे रिक्त असतानाही प्रभारी अधिकार्‍यांशी संवाद ठेवला. प्रशासकीय यंत्रणेवर साथरोग नियंत्रणाचा ताण वाढलेला असल्याने शक्यतो संवादाची भूमिका ठेऊन प्रशासनाला सतत प्रोत्साहन व धीर दिला.

याचाच परिणाम म्हणून मागील वर्षीच्या साथकाळात आमदार निधीतून 30 लाखांपेक्षा अधिक निधी देऊन ग्रामीण रुणालयामध्ये 50 खाटांचे ऑक्सीजन बेड उपलब्ध करून दिले. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळाले. काल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत सर्व अधिकार्‍यांची आढावा बैठक घेऊन करोना महामारी रोखण्यासाठी सर्वांनीच युध्द पातळीवर काम करण्याचे आवाहन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील 100 रुग्णांसाठीचे कोव्हिड सेंटर अपुरे पडत असल्याने अधिक मोठे कोव्हिड सेंटर सुरू करण्याच्या प्रशासनाला सूचना करत 200 बेड्सची सुविधा असणारे आदिवासी मुलांचे वसतिगृह आणि अधिक 200 बेड्सची सुविधा असणारे आदिवासी मुलींचे वसतिगृह ताब्यात घेण्यात आले.

तेथे तातडीने आवश्यक ती साधने उपलब्ध करून देण्यात येऊन रुग्ण दाखल करून घ्यायला सुरुवातही झाली. कालअखेर आदिवासी मुलांच्या वसतिगृहात 57 रुग्ण दाखल झाल्याचे आ. लहू कानडे यांनी सांगितले.

प्रांताधिकारी अनिल पवार आणि तालुका आरोग्याधिकारी डॉ. मोहन शिंदे यांच्याशी चर्चा करून या नवीन 400 बेड्स उपलब्ध असणार्‍या करोना सेंटरसाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळही प्रांताधिकार्‍यांनी उपलब्ध करून दिले. रुग्णांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून वॉटर फिल्टरची सुविधा सुरू केली आहे. तसेच रुग्णांना सकस आहार मिळावा म्हणून सकाळी नाश्ता व चहा, दुपारी वरणभात व पोळी भाजी व संध्याकाळी पुन्हा वरणभात व पोळी भाजी अशा स्वरुपाचा आहार उपलब्ध करून देण्याचीही सोय केली आहे.

सदरच्या तिनही इमारती शासकीय असून नव्यानेच बांधण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठीचे बेड्स इथे कामी आले आहेत. शिवाय 50 ऑक्सीजन बेडची सुविधा असणारे ग्रामीण रुग्णालय शेजारीच असल्याने या सेंटरमधील रुग्णांला अधिकच्या उपचाराची सुविधा शेजारीच उपलब्ध आहे. या सर्व सुविधा मोफत उपलब्ध असल्याने ज्यांचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आला आहे, अशा रुग्णांनी पुरेशी जागा नसल्यास घरीच न थांबता या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन आ. लहू कानडे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com