पोलीस अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करुन कारवाई व्हावी
सार्वमत

पोलीस अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करुन कारवाई व्हावी

आ. लहू कानडे यांची राज्याच्या गृहमंत्र्याकडे तक्रार

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

लोकप्रतिनिधी म्हणून मला अंधारात ठेवून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पढेगाव, कारेगाव इत्यादी ठिकाणच्या पोलीस उपकेंद्रांची उद्घाटने कशी केली? तसेच लोकवर्गणी करून चौक्या बांधून नियमांचा भंग तर केला.

महाविकास आघाडीच्या सरकारकडे जनकल्याणाच्या कामासाठी पैसे नाहीत म्हणून भीक मागावी लागत असल्याचा चुकीचा संदेश अधिकार्‍यांनी जनतेमध्ये पसरवला व महाविकास आघाडी सरकारची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप आ. लहू कानडे यांनी करत अशा या अधिकार्‍यांची चौकशी करुन त्यांच्याविरुध्द कारवाई करावी, अशी मागणी आ. कानडे यांनी राज्याचे गृहमंत्र्यांकडे केली आहे.

आ. लहू कानडे करोनाग्रस्त झाल्याने मुंबई येथे उपचार घेत असताना त्यांच्या अनुपस्थितीत शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी शासनाचे कोणतेही आदेश नसताना तालुकाभर विरोधी पक्षाच्या पुढार्‍यांना हाताशी धरून पोलीस चौक्या उभारण्याचा व उद्घाटने करण्याचा धुमधडाका लावला.

शासनाकडे निधी उपलब्ध असताना व मी स्वतः अधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये आमदार निधीमधून निधी उपलब्ध करून देण्याचे सांगितले असताना लोकवर्गणी करण्याची काय आवश्यकता भासली? या पद्धतीने किती लाख रुपये गोळा केले? कोणाकडून वर्गणी घेतली? बांधकामासाठी कोणाकडून जमीन खरेदी केली? बांधकामाला कोणत्या सक्षम अधिकार्‍याने प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली? बांधकाम पूर्ण झाले असल्यास त्याचे किती मूल्यांकन झाले व त्याला पूर्णत्वाचा आणि नाहरकत दाखला मिळाला आहे काय? असे अनेक प्रश्न आमदार कानडे यांनी उपस्थित केले आहेत.

अपूर्ण किंवा बेकायदेशीर बांधकामाची उद्घाटने करू नयेत असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत अशा कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाही. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून आपण मला अंधारात ठेवून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पढेगाव, कारेगाव इत्यादी ठिकाणच्या पोलीस उपकेंद्रांची उद्घाटने कशी केली ? हवा तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे सांगितले असताना आणि विकास कामासाठी महाविकास आघाडीचे सरकार सक्षमपणे निधी उपलब्ध करून देत असताना लोकवर्गणी करण्याचे कोणी ठरविले ? व तसे अधिकार संबंधितांना आहेत का? याचा खुलासा आमदार कानडे यांनी मागितला आहे.

या प्रकारच्या कामासाठी मात्र पोलीस अधिकारी प्रचंड उत्साह दाखवत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी हे या पोलीस निरीक्षकांच्या बेकायदेशीर वागणुकीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी पोलीस उपकेंद्रांच्या उद्घाटनामध्ये पुढाकार घेऊन या गैरकृत्यांमध्ये सामील असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणून या सर्वांची गोष्टींची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशा स्वरूपाची मागणी आ. लहू कानडे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com