कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.

नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत देखील सात महत्वपूर्ण निर्णय घेतले असून या निर्णयामध्ये डिसेंबर 2019 पर्यंतच्या राजकीय- सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे.

मागील सरकारच्या काळात घेतल्या गेलेल्या अनेक चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आपल्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी आंदोलने करावी लागली होती. या सरकारच्या काळातच शेतकर्यांनी ऐतिहासिक संप देखील केला होता. आपल्या न्याय मिळावा व आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले होते.

या आंदोलनावेळी कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकर्याला आपल्या जीवाचे बलिदान द्यावे लागले होते. या आंदोलना दरम्यान त्यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकर्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. कुणावरही अन्याय झाल्यावर ती व्यक्ती लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणारच. त्यामुळे या शेतकर्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत याबाबत माझा पाठपुरावा सुरू होता.

त्यामुळे आंदोलन करणार्या व आंदोलनात सहभागी झालेल्या ज्या शेतकर्यांवर व नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते ते गुन्हे मागे घेण्याच्या पाठपुराव्याला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून यश मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये डिसेंबर 2019 पर्यंत सामाजिक न्याय हक्कासाठी जी काही राजकीय किंवा सामाजिक आंदोलन करण्यात आली.

या आंदोलनादरम्यान ज्या-ज्या आंदोलनकर्त्यांवर शासनाच्यावतीने गुन्हे दाखल करण्यात येऊन खटले चालविले जात आहेत. हे सर्व खटले मागे घेण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकर्यांना, नागरिकांना व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.