कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत कोपरगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर येवून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

आ. आशुतोष काळे यांनी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला दिल्यामुळे नुकसान झालेल्या सर्वच शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता.

त्या निर्णयातून यापूर्वीच नुकसानभरपाईच्या मदतीच्या पहिल्या हफ्त्याची 3 कोटी 1 लाख रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम मागील वर्षी शेतकर्यांना मिळालेली आहे व दुसर्या टप्प्यातील 4 कोटी 64 लाख 58 हजार रुपयांची रक्कम लवकरच शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

जून ते ऑक्टोबर 2020 या महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोदावरी नदीला पूर येऊन उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे नुकसान होऊन शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला होता. शेतातील पिकांची काढणी करून मोकळ्या जागेवर सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांचे ज्या ठिकाणी ढिगारे लावले होते त्या पिकांना जागेवरच मोड आल्यामुळे त्या पिकांचे देखील नुकसान झाले होते.

नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी मदत,पुनर्वसन व महसूल विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील शेतकर्यांना पहिल्या टप्प्यात 3 कोटी 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई महाविकास आघाडी सरकारने मागील वर्षी दिलेली आहे. व या नुकसानीच्या दुसर्या टप्प्याची 4 कोटी 64 लाख 58 हजार रुपयांची रक्कमही महाविकास आघाडी सरकारने देण्याचा निर्णय घेऊन लवकरच ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

करोना संकटामुळे अर्थव्यवस्थेची चाके रुतलेली असतांना महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदतीचा दुसरा हफ्ता दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहे.