कोळपेवाडी |वार्ताहर| Kolpewadi

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे अनेक फळपीक उत्पादक शेतकर्यांचे नुकसान झाले. मात्र फळपीक विमा भरून देखील नुकसानभरपाई मिळाली नाही.

भविष्यात फळपीक विमा भरणार्या सर्वच शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु मात्र पीक विमा मिळवून दिल्याबद्दल कधीही फ्लेक्स बोर्ड लावणार नाही, अशी मिश्कील टिपणी आमदार आशुतोष काळे यांनी केली.

कोपरगाव तालुका बीज गुणन केंद्र येथे आयोजित कौशल्य आधारित डाळिंब छाटणी व विविध मशागतीची कामे या शेतमजूर प्रशिक्षण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले की, फळपीक उत्पादक शेतकरी विम्याची रक्कम भरतो व त्या शेतकर्याचे नुकसान झाल्यास त्या शेतकर्याला नुकसानभरपाई मिळते. मात्र दुर्दैवाने ही नुकसानभरपाई मिळवून दिल्याचे देखील फ्लेक्स लावून कोणतेही योगदान नसतांना देखील श्रेय घेण्याचा यापूर्वी प्रयत्न झाला आहे. यावर्षी ट्रिगर पद्धतीमुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले.

त्यासाठी डाळींब, पेरू आदी फळ पिकांच्या ट्रिगरपद्धतीमध्ये बदल करावा याबाबत कृषी आयुक्तांची भेट घेतली असून त्यानी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ट्रिगर पद्धती बदलण्याबरोबरच मतदार संघात स्वयंचलीत हवामान केंद्रांची संख्या वाढवावी. यासाठी शासन दरबारी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमाताई जगधने, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख मार्गदर्शक पुरुषोत्तम हेंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, मंडल कृषी अधिकारी माधुरी गावडे, चांगदेव जवने, अविनाश चंदन, मनोज सोनवणे, कृषीमित्र, प्रशिक्षणार्थीं शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.