कांदा निर्यातबंदी निर्णय दुर्दैवी, शरद पवार हेच मार्ग काढतील - आ. काळे

कांदा निर्यातबंदी निर्णय दुर्दैवी, शरद पवार हेच मार्ग काढतील - आ. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

केंद्र शासनाने अचानकपणे घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय दुर्दैवी असून यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निश्चितपणे मार्ग काढतील,

अशी प्रतिक्रिया आमदार आशुतोष काळे यांनी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीच्या घेतलेल्या निर्णया बद्दल दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यामुळे कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरणे साहजिक आहे. मागील काही वर्षांपासून शेतकरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शेती व्यवसाय करीत आहेत. करोनामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला असून पर्यायाने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे.

लॉकडाऊनमुळे चालू वर्षी द्राक्ष मातीमोल भावात विकल्यामुळे व डाळिंब रोगाच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे हजारो हेक्टर डाळिंब बागा शेतकर्‍यांनी नष्ट केल्या आहेत. साठविलेल्या कांद्यातून शिल्लक असलेल्या थोड्याफार चांगल्या कांद्याला चांगला दर मिळून रब्बी हंगाम उभे करण्याचे स्वप्न पाहणार्‍या शेतकर्‍यांचे स्वप्न या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे उद्ध्वस्त झाले आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकर्‍यांना दिलासा देत आहे.

महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांना महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून सरसकट दोन लाख रुपये कर्जमाफी दिली आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पोटी कोपरगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना शासनाकडून पहिल्या टप्प्यात 8 कोटी 28 लाख व दुसर्‍या टप्प्यात 19 कोटी 67 लाख रुपये असे एकूण 27 कोटी 95 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. जागतिक करोनाच्या संकटात देखील महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे.

आज शेतकर्‍यांना केंद्र शासनाकडून मदतीची गरज असताना केंद्र शासनाने घेतलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय हा फक्त दुर्दैवीच नसून हा निर्णय तुघलकी निर्णय म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तरीही याबाबतीत शेतकर्‍यांच्या प्रश्नांची जाण असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार याबाबत निश्चीतपणे मार्ग काढतील असा आशावाद आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com