कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जात असलेल्या राज्य मार्ग 65 व राज्यार्ग 7 चा आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्य योजने

अंतर्गत पहिल्या टप्प्यात समावेश करून निविदा प्रसिद्ध करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांनी नुकतेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांना दिले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून जाणार्या झगडे फाटा-तळेगाव-वडगाव पान (राज्य मार्ग 65) व सावळीविहीर-चास -भरवस-लासलगाव (राज्य मार्ग 7) या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. हे दोनही राज्यमार्गांचा आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत समावेश आहे. त्यामुळे या रस्त्यांचा इतर योजनेत समावेश करता येत नसल्यामुळे या राज्यमार्गांचे नूतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असून खराब रस्त्यामुळे अनेक लहानमोठे अपघात घडत आहेत. तसेच सावळीविहीर-चास-भरवस-लासलगाव या सात नंबर राज्यमार्गावरून वर्षभर परराज्यातून साईभक्त येत असतात. त्यांना देखील या खराब रस्त्यामुळे अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे प्रमुख राज्यमार्ग खराब झाल्यामुळे या मार्गाने येणार्या वाहनांनी आपला मार्ग बदलून घेतला आहे.

त्यामुळे वाहनांची वर्दळ कमी होवून त्याचा परिणाम राज्यमार्गालगत व्यवसाय करणार्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर होवून त्यांचे व्यवसाय थंडावले असून हे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहे. सध्या गळीत हंगाम सुरु असून ऊस वाहतूक करणार्या वाहनांना देखील या खराब रस्त्यामुळे अडचणी येत आहे. या रस्त्यांमुळे होत असलेल्या अडचणींची दखल घेवून रस्त्यांच्या कामाचा आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत पहिल्या टप्प्यात समावेश करून निविदा प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनाची दखल घेवून सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी (राज्य मार्ग 65) व (राज्य मार्ग 7) या दोनही राज्यमार्गांच्या नूतनीकरणासाठी आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत पहिल्या टप्प्यात समावेश करणार असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत पहिल्या टप्प्यात समावेश येणार्या दिलेल्या निवेदनात आमदार आशुतोष काळे यांना दिली आहे. यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, कोपरगाव राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले उपस्थित होते.