जगताप पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश करून साहित्याचा वारसा चालवावा

खा. डॉ. विखेंकडून प्रवेशाचे निमंत्रण || शब्दगंध साहित्य संमेलनाचा समारोप
Sujay Vikhe
Sujay Vikhe

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याच्या दक्षिण भागात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यानंतर साहित्याचे कार्यक्रम आयोजित करणारे आमदार संग्राम जगताप एकमेव आहेत. गडाख यांच्यानंतर साहित्याची गाडी जगताप यांनी पुढे ढकलली आहे. अन्यथा ते यापूर्वी गरबा, दहीहंडी, गणेशोत्सव अशा कार्यक्रमात पुढाकार घेत होते. परंतु महायुतीच्या संपर्कात आल्याने ते आता साहित्याचे कार्यक्रम आयोजित करत आहेत. अन्यथा गेल्या तीन वर्षात त्यांनी साहित्याचा कार्यक्रम आयोजित केला नव्हता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवाजी कर्डिले यांच्यामध्ये बदल घडला. आता भाजपच्या संपर्कात आलेल्या आ. जगताप यांनी माजी आमदार अरुण जगताप यांच्यासह भाजपमध्ये यावे व साहित्याचा वारसा आणखी पुढे चालवावा, अशा शब्दांत खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी जगताप पिता-पुत्रांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले.

शब्दगंध साहित्य परिषद व महापालिका आयोजित दोन दिवसीय 15 व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात, खा.डॉ. विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी बोलताना खा.डॉ. विखे यांनी जगताप पिता-पुत्रांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले. ते म्हणाले,‘मी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कर्डिले हे दोघे संमेलनाला भाजपचे प्रतिनिधी म्हणून आलो आहोत. जिल्ह्याच्या उत्तर भागात साहित्याचे कार्यक्रम नियमितपणे होतात.

पद्मश्री विखे यांच्या नावाने साहित्य पुरस्कार अनेक वर्षांपासून दिले जातात. त्यानिमित्ताने अनेक साहित्यिक उपस्थित असतात. जिल्ह्याच्या दक्षिण भागात ज्येष्ठ नेते गडाख यांच्यानंतर साहित्याचे कार्यक्रम आयोजित करणारे आ.जगताप एकमेव आहेत. हा महायुतीच्या संपर्कात आल्याचा परिणाम आहे. अन्यथा गेल्या तीन वर्षांत त्यांनी साहित्याचा कार्यक्रम आयोजित केला नव्हता. आता भाजपच्या संपर्कात आल्याचा फायदा घेत भाजपमध्ये यावे व साहित्याचा वारसा आणखी पुढे चालवावा, अशा शब्दांत खा.डॉ. विखे यांनी पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले.

दरम्यान, विखे व कर्डिले यांना मुंबईला जाण्याची घाई असल्याने त्यांनी व्यासपीठ सोडले. ते गेल्यानंतर भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) घनश्याम शेलार यांनी आ. जगताप हे भाजपच्या संपर्कापेक्षा साहित्याच्या संपर्कात अधिक राहिले तर शहरात विकासात्मक बदल ते घडवू शकतील, असा टोला लगावला. त्यानंतर आ. जगताप म्हणाले, राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने दिवसभरात वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात मी येत असतो. म्हणून त्यांच्या संपर्काचा माझ्यावर परिणाम होईल असे नाही, असे सांगत खा.डॉ. विखे यांच्या निमंत्रणाला थेट ऐवजी अप्रत्यक्षपणे नकार असल्याचे सूचित केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com