आमदार गायकवाड यांच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाचा राहात्यात मोर्चा

आमदार गायकवाड यांच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाचा राहात्यात मोर्चा

राहाता |प्रतिनिधी| Rahata

मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखविणारे बुलढाणा जिल्ह्यातील आ. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी, या मागणीसाठी राहाता तालुक्यातील आंबेडकरी समाजाच्यावतीने राहाता पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत निवेदन देण्यात आले. राहाता चौक ते पोलीस ठाणे असा हा मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी निवेदनात म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे आ. संजय गायकवाड यांनी दोन कुटुंबियांच्या वादामध्ये चुकीची भूमिका बजावून अ‍ॅट्रोसिटी दाखल करणार्‍यांना झोडून काढण्याची भाषा वापरली आहे. आंबेडकरी समाज आणि अ‍ॅट्रोसिटी कायद्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करून मागासवर्गीय समाजातील नागरिकांना षडयंत्राद्वारे त्रास देण्याचे काम चालविले आहे.नेहमीच वादग्रस्त विधाने करून मागासवर्गीय समाजाच्या विरोधात भूमिका घेऊन आंबेडकरी समाज बांधवांच्या भावनांना ठेच पोहोचविणार्‍या तसेच समाजा समाजांत जातीय तेढ निर्माण करणार्‍या आ. संजय गायकवाड यांचा आम्ही निषेध करीत असून आमदार असलेल्या या माणसामुळे राज्यात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नेहमीच वादग्रस्त विधाने करून आंबेडकरी समाजाचा अपमान करणार्‍या या आ. गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करत असल्याचे निवेदन पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांना देण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन पँथर पार्टीचे बाळासाहेब गायकवाड, पप्पू बनसोडे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिमोन जगताप, साकुरीचे उपसरपंच सचिन बनसोडे, निमगावचे उपसरपंच अजय जगताप, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड, सुनीता टाक, अलका शेजवळ, तुषार सदाफळ, दीपक शिंदे, राजेंद्र पाळंदे, वसंत खरात, गणेश निकाळे, अनिल त्रिभुवन, दिलीप वाघमारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com