
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटींवरून पाच कोटी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबत अध्यादेश जारी करण्यात आल्याने यंदा सर्व आमदारांना एक कोटींचा निधी अधिक मिळणार आहे.
आतापर्यंत प्रत्येक विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांना त्यांच्या मतदार संघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी पाच कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ केल्यामुळे सामान्य जनतेच्या विकासाची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. विधानसभेतील 288 आणि विधान परिषदेतील 62 अशा एकूण 350 आमदारांना 350 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे.
नगर जिल्ह्याला 14 कोटींचा लाभ
नगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघाचे 12 आमदार, विधानपरिषदेचा एक आमदार आणि शिक्षक पदवीधर मतदारसंघातील एक आमदार असे 14 जणांना यंदापासून अतिरिक्त 1 कोटी रुपये असा वर्षाकाठी एकूण 14 कोटी रुपयांचा अधिक निधी विकास कामांसाठी मिळणार आहे.