
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
राज्यातील नगरपालिका व महानगरपालिकामधील शिक्षक व शिक्षकेतर सेवानिवृत्त कर्मचारी यांचे वेतन आणि सेवानिवृत्ती वेतन व तसेच इतर देयके त्यांना वेळेवर मिळावी, अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार व विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे मागणी करताना त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले , राज्यातील नगरपालिका व महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कर्मचार्यांना डीसीपीएस योजना लागू नसल्याने सेवानिवृत्तीनंतर शासनाचे लाभ व विमा यापासून नगरपालिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वंचित राहणार आहेत. त्यामुळे त्यांना शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही.
तसेच राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी वेतन वेळेवर होत नाही. सेवानिवृत्त वेतनधारकांचे कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम, तसेच वैद्यकीय बिलेे व शासनाच्या हप्त्याची 50 टक्के रक्कमही वेळेवर जमा होत नाही. त्यामुळे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सेवानिवृत्त शिक्षकांना सेवानिवृत्ती मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. जी नियमावली शिक्षण विभागाला लागू आहे तीच नियमावली नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावर चर्चा करताना शालेय शिक्षण मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नगर विकास खाते व शालेय शिक्षण विभाग यांची तातडीने एकत्रीत बैठक घेण्याचे मान्य केले. तसेच या बैठकीला आ. डॉ. तांबे व सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात येईल, असे सांगितले. आ. डॉ. तांबे यांनी लक्षवेधीद्वारे केलेल्या मागणीमुळे राज्यातील नगरपालिका व महानगरपालिकेमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.