आमदार डॉ. सुधीर तांबे यांना टीडीएफची उमेदवारी

आमदार डॉ. सुधीर तांबे यांना टीडीएफची उमेदवारी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदार डॉ. सुधीर तांबे यांना राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडी (टिडीएफ) ने आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) च्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी पुणे विद्यार्थी गृह येथे टीडीएफचे प्रदेश अध्यक्ष विजय बहाळकर यांच्या अध्यक्षतेत झाली.

बैठकीत फेब्रुवारी 2023 मध्ये होणार्‍या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर संघातून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. टीडीएफचे राज्य कार्यवाह हिरालाल पगडाल यांनी डॉ.सुधीर तांबे यांची उमेदवारी पुरस्कृत करावी असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ माजी आमदार नानासाहेब बोरस्ते (नाशिक), संजय पवार (धुळे), राजेंद्र लांडे (अहमदनगर), भाऊसाहेब बाविस्कर (जळगाव), सुधीर काळे (नगर महानगर), जी. के. थोरात (पुणे) आदींनी प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली.

माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी आ. सुधीर तांबे यांनी गेल्या दीड दशकात शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सोडवलेल्या प्रश्नांचा आढावा घेतला. डॉ. तांबे शिक्षक व पदवीधर मतदारांशी सर्वदूर संपर्क ठेवलेला आहे, असे ते म्हणाले.

टीडीएफचे अध्यक्ष विजय बहाळकर म्हणाले, लोकशाही, समाजवाद, विज्ञाननिष्ठा, धर्मनिरपेक्षता आणि नियोजन ही मूल्ये कधी नव्हे ती आज अडचणीत आली आहेत. डॉ. तांबे यांनी या मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने संघर्ष केला. त्यामुळेच टीडीएफ त्यांना लागोपाठ चौथ्यावेळी उमेदवारी बहाल करीत आहे. ते निवडून येतील आणि त्यासाठी टीडीएफचे राज्यभरातील कार्यकर्ते कठोर परिश्रम करतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले, टीडीएफ सातत्याने माझ्या पाठीशी उभी आहे, मी टीडीएफचा एक घटक आहे. दिवंगत आमदार आ. शिवाजीराव दादा पाटील यांनी आणि माजी आमदार कै. जे. यू. नाना ठाकरे यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले. हजारो टीडीएफ कार्यकर्त्यांचा सातत्याने भक्कम पाठिंबा मिळाला. त्यामुळेच गेल्या तीन निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. यावेळी देखील टीडीएफने मला पुन्हा पुरस्कृत करून माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे. त्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असून आगामी काळात शिक्षण आणि शिक्षक यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहील.

यावेळी टीडीएफचे उपाध्यक्ष हनुमंतराव भोसले, के. एम. ढोमसे, अरविंद कडलग, डी. जे. मराठे, सागर पाटील मुरलीधर मांजरे, दत्तराज सोनावळे, किशोर जाधव, शिवाजी कामथे, सुशांत कविस्कर यांच्यासह टीडीएफचे विभाग सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com