आ. डॉ. सुधीर तांबे विधानपरिषदेच्या गटनेतेपदी

आ. डॉ. सुधीर तांबे विधानपरिषदेच्या गटनेतेपदी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

पदवीधर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय व निमशासकीय, अशासकीय कर्मचारी, यांच्या विविध प्रश्नांसाठी विधानपरिषदेत सातत्याने आग्रही मागणी करत या प्रश्नासाठी पाठपुरावा करणारे नेता नव्हे मित्र अशी ओळख असलेले नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांची विधानपरिषदेच्या काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली आहे.

आमदार डॉ तांबे यांनी बी. जे. मेडिकल सारख्या देशातील नावाजलेल्या महाविद्यालयातून एम. एस. शिक्षण घेतल्यानंतर संगमनेर मध्ये चार दशके गोरगरिबांना आरोग्य सेवा दिली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या सहकार, शिक्षण, समाजकारण, कृषी अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देताना आदिवासी, अपंग व मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी मोठे काम केले.

लोकआग्रहास्तव राजकारणात आल्यानंतर त्यांनी अत्यंत कार्यक्षम आमदार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात सातत्याने बेरोजगार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अशासकीय कर्मचारी , डॉक्टर, वकील ,विविध संघटना,यांच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा केला आहे . शिक्षण क्षेत्रात कायम विनाअनूदानित शाळेचा कायम शब्द काढण्यासाठी विशेष पाठपुरावा केला. याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करावी, बेरोजगार महामंडळ असावे, रस्ते अपघात, शेतकरी विमा प्रश्न ,ज्युनिअर कॉलेजच्या शाळा व तुकड्यांना मान्यता, नवीन शिक्षक भरती, कला व क्रीडा विषयासाठी स्वतंत्र शिक्षक असे प्रश्न सातत्याने शासन दरबारी मांडले आहेत.

काँग्रेस पक्ष व पुरोगामी विचारांचे कायम एकनिष्ठ असलेले आमदार डॉ. सुधीर तांबे हे 2009 पासून नाशिक पदवीधर मतदार संघाचे विक्रमी मताधिक्याने प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांची ही तिसरी टर्म असून यांची नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून विधान परिषदेत निवड झाली आहे.

आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या गटनेतेपदाबद्दलच्या निवडीबद्दल काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, आमदार भाई जगताप यांचे सह अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, टीडीएफ संघटना, विविध पुरोगामी संघटना, विविध कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com