स्व. भाऊसाहेब थोरात यांची आदर्श तत्वे सहकाराला मार्गदर्शक - आ. तांबे

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती उत्साहात साजरी
स्व. भाऊसाहेब थोरात यांची आदर्श तत्वे सहकाराला मार्गदर्शक - आ. तांबे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

अमृत उद्योग समूहाचे संस्थापक व थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मदिन हा संपूर्ण तालुक्यात प्रेरणादिन म्हणून साजरा होत असून आज करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावांमध्ये त्यांना अभिवादन करत मोठ्या उत्साहात प्रेरणा दिन साजरा झाला. भाऊसाहेब थोरात यांनी समाजकारण व राजकारणात कधीही तडजोड केली नसून स्वच्छ व पारदर्शी सहकाराची त्यांची तत्त्वे ही देशातील सहकारासाठी सदैव मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

कारखाना कार्यस्थळावर प्रेरणास्थळ येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.माधवराव कानवडे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, रामदास वाघ, दूध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, रामहरी कातोरे, लक्ष्मणराव कुटे, सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे, आर.बी.रहाणे, सुरेश थोरात, विष्णुपंत रहाटळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, वयाच्या अठराव्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समाज विकासासाठी सहकाराचा मार्ग निवडला. त्यांनी राजकारणात व समाजकारणात कधीही तडजोड केली नाही. तडजोडी शिवाय स्वच्छ व पारदर्शी कामातून चांगले समाजकारण करता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाऊसाहेब थोरात होय! अत्यंत दूरदृष्टीने त्यांनी संगमनेर तालुक्याच्या विकासाची पायाभूत उभारणी केली. याच मार्गावर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार व विकास सुरू असून देशातील सहकारासाठी आदर्श मॉडेल ठरला आहे.

साखर कारखाना, दूध संघ, विविध शैक्षणिक संस्था या बरोबर जिल्हा बँक व राज्य बँकेतून त्यांनी गोरगरीबांच्या विकासासाठी काम केले. आयुष्यभर सामाजिक विकासाचा व्रत घेतलेल्या या व्यक्तिमत्वाने वयाच्या उत्तरार्धात पुढील भावी पिढ्यांसाठी दंडकारण्य अभियान ही लोकचळवळ समाजाला दिली.

भाऊसाहेब थोरात हे खर्‍या अर्थाने सहकारातील शिरोमणी व संत ठरले. तर डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी शेती संशोधनात मोठे काम केले असून देशांमध्ये हरितक्रांती आणली आणि त्यामुळे खर्‍या अर्थाने देश अन्नधान्यात आणि दुधामध्ये स्वयंपूर्ण झाला. ते खर्‍या अर्थानं समाजशास्त्रज्ञ असल्याचे गौरवोद्गार आमदार डॉ. तांबे यांनी काढले.

अ‍ॅड.माधवराव कानवडे म्हणाले, संगमनेर तालुक्यातील व जिल्ह्यातील गोरगरीबांच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित करणारे भाऊसाहेब थोरात खर्‍या अर्थाने सहकारातील संत होते. माणूस हा कर्तृत्वातून संत होतो. असा सर्वसामान्यांसाठी झटणारा हा देवमाणूस त्यांच्या विचाराने सदैव आपल्यात आहे.

प्रा. बाबा खरात म्हणाले, भाऊसाहेब थोरात हे खर्‍या अर्थाने व्हिजनरी आर्किटेक्ट होते. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी गावागावात करोनाचे नियम पाळून प्रेरणा दिन साजरा केला. यावेळी सेवा सोसायटी, ग्रामपंचायत, दूध संस्था, पतसंस्था अशा विविध सहकारी संस्थांमध्ये प्रेरणा दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त रक्तदान शिबीर, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com