नवीन पाणी निर्माण करून पठार भागाला पिण्याचे पाणी देणारच

... तर मी राजकारण सोडून देईल - आ. किरण लहामटे
नवीन पाणी निर्माण करून पठार भागाला पिण्याचे पाणी देणारच

कोतूळ |वार्ताहर| Kotul

जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर पिण्याचे पाणी योजनेतून संगमनेर तालुक्यातील पठार भागाला पिण्याचे पाणी देणारच, असा विश्वास आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणाचा पाणी प्रश्न पेटला आहे. पाणी प्रश्नावरून संगमनेर तालुक्यातील पठार भाग आणि अकोले तालुक्यातील मुळा भाग यांच्यात संघर्ष सुरू आहे. याबाबत आपली भूमिका जाहीर करण्यासाठी पिंपळगाव खांड धरण स्थळावर मुळा परिसरातील शेतकर्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सिताराम पाटील गायकर होते.

आमदार श्री. लहामटे यावेळी म्हणाले, पिंपळगाव खांड धरणात नवीन 100 ते 150 एमसीएफटी पाणी आल्यानंतरच पठारावरील पाणी योजना चालू होईल. सरकार जनतेला पिण्याचे पाणी देऊ नका ही भूमिका कशी घेणार. जनतेसाठीच तर सरकार आहे ना? धरणात बुडवू पोलीस संरक्षणात पाणी नेऊ असे मी म्हटलोच नाही. असे म्हटलो असेल तर मी राजकारण सोडून देईल, असे आमदार लहामटे यांनी स्पष्ट केले. विरोधक शब्दांचा खेळ करून गावोगावी जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, असा टोला त्यांनी पाणी बचाव कृती समितीला लगावला.

आम्ही जनतेचे डॉक्टर आहोत, आम्ही चेहरे चांगले ओळखतो आणि जनतेचे प्रश्नही जाणतो आणि सोडवतोही. विरोधकांनी डुप्लिकेटपणाचा धंदा बंद करावा. पिंपळगाव खांड धरणात नवीन दीडशे ते दोनशे एमसीएफटी नवीन पाणी निर्माण करू. त्यासाठी पिंपळगाव खांड धरणाच्या खालील बाजूस अथवा धरणाच्या वरील बाजूस पिंपरी येथे बंधारा बांधून आणि हे नवीन पाणी निर्माण करून पिंपळगाव खांड धरणात आणू मगच पठार भागाची योजना चालू करू. मी राजा हरिश्चंद्राच्या नगरीत राहतो, जो शब्द देतो तो पूर्ण करतो असे आ. लहामटे यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात सिताराम पाटील गायकर म्हणाले, मुळेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सरकार मध्ये अजितदादांसारखा कर्तबगार माणूस आहे. त्यांच्यामुळेच पिंपळगाव खांड धरण झाले. ज्यांनी धरण दिले ते पाण्याचा प्रश्न निश्चित सोडवतील. परिसरातील जनतेने मला चाळीस वर्षे जनतेची सेवा करण्याची संधी दिली. या जनतेच्या अन्नात विष कालावणार नाही. पठार भागातील जनताही आपलीच आहे. त्यांना देखील पाणी मिळालेच पाहिजे या मताशी आम्ही आहोत.नवीन पाणी निर्माण करून त्यांच्या पिण्याचा पाणीप्रश्न निश्चित सोडवला जाईल, असे गायकर म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कैलासराव शेळके, भाऊसाहेब रकटे, ज्येष्ठ नेते प्रभाकरराव फापाळे, हेमंत देशमुख, संजय साबळे, भाऊसाहेब बराते, सुभाष गोडसे, बाळासाहेब रंधे, योगेश गोडसे, भानुदास डोंगरे, किशोर गोडसे, विजय जगताप आदींची भाषणे झाली. विकास शेटे यांनी सूत्रसंचालन केले.

पाणी बचाव कृती समितीचा बहिष्कार

दरम्यान पिंपळगाव खांड धरण पाणी बचाव कृती समितीच्यावतीने काल अकोले तहसीलदारांना निवेदन दिले. लाभ क्षेत्रातील वेगवेगळ्या गावांनी पठार भागाला पिंपळगाव खांड धरणातून पाणी न देण्याबाबतचे ठराव तहसीलदार यांचेमार्फत शासनाला दिले. या पाणी बचाव समितीने व समितीच्या कार्यकर्त्यांनी या शेतकरी मेळाव्यावर बहिष्कार टाकत या मेळाव्याकडे पाठ फिरवली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com