जनमत असेल त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी- आ. डॉ. लहामटे

जनमत असेल त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी- आ. डॉ. लहामटे

अकोले |प्रतिनिधी| Akole

ज्या उमेदवारांना जनमत असेल त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली जाईल असे स्पष्ट मत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केले तर अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक असून त्यास यश येईल, अशी खात्री आहे. महाविकास आघाडी न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 17 प्रभागात उमेदवार उभे करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी केले.

अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुकांनी आपल्या शिष्टमंडळासह गर्दी केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते सीताराम पा. गायकर, अशोकराव भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव खांडगे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, महिला अध्यक्षा स्वातीताई शेणकर, ज्येष्ठ नेते संपतराव नाईकवाडी आदींसह नेते उपस्थित होते.

यावेळी सीताराम पा. गायकर म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी असल्याने तालुक्यातही महाविकास आघाडी झाल्यास विकास कामासाठी निधी आणणे सोयीचे होणार आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्र यावे. प्रत्येक प्रभागातील त्या त्या पक्षाची ताकद पाहून उमेदवारी देता येणे शक्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व्हावी, असे आवाहन केले.

अशोकराव भांगरे म्हणाले, अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्व 17 प्रभागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 17 उमेदवार देऊ शकतो. परंतु शक्यतो महाविकास आघाडी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येक प्रभागासाठी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बहुमताने निवडून आले असल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे चित्र असतांना राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्ते व्यक्त करीत आहे.

अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप, मनसे हे स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. शिवसेना मात्र महाविकास आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे समजते. मात्र सन्मानाने योग्य जागा मिळाव्यात अशी अपेक्षा सेनेने व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com